पुणे

कर्णबधिर ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी व डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबिरांचे आयोजन – खासदार डॉ. अमोल कोल्हे

रोखठोक महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन

पुणे-शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दि. ५ ते १० फेब्रुवारी या काळात कर्णबधिर ज्येष्ठ नागरिकांची तपासणी व मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबिरांचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही खा. डॉ. कोल्हे यांनी केले आहे.
स्टार्की फाउंडेशन अमेरिका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंचच्या निमंत्रक खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या सहकार्यातून जगदंब प्रतिष्ठान आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वतीने दि. ५ फेब्रुवारी रोजी कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय, सणसवाडी, ता. शिरूर येथे सकाळी ९ ते ३ यावेळेत पहिले शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
दुसरे शिबीर हडपसर मतदारसंघातील साने गुरुजी शिक्षण संस्था, हडपसर गाव येथे दि. ६ फेब्रुवारी रोजी होणार असून दि. ७ फेब्रुवारी रोजी भोसरी मतदारसंघातील स्पाईन रोडवरील,हृदय हॉल सेक्टर नं ४ प्राधिकरण संतनगर याठिकाणी होणार आहे. तर दि. ८ फेब्रुवारी रोजी ग्रामीण रुग्णालय चाकण, ता. खेड येथे चौथे शिबीर आयोजित केले जाणार आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिबीर दि. ९ फेब्रुवारी रोजी मंचर येथील यशवंतराव चव्हाण सभागृह, मार्केटयार्ड तर दि. १० फेब्रुवारी रोजी जुन्नर विधानसभा मतदारसंघातील शिबीर रघुकुल मंगल कार्यालय नारायणगाव या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी खासदार डॉ. कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नांतून ‘मोफत’ डिजिटल श्रवणयंत्र शिबिरांची मालिका आयोजीत करण्यात येणार असून सकाळी ९ ते ३ या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्यासोबत आधारकार्ड आणणे आवश्यक आहे.
संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने आपण प्रत्यक्ष या शिबिरांसाठी उपस्थित राहू शकणार नसल्याने राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार, पदाधिकारी यांच्या हस्ते या शिबिरांचे उदघाटन होईल असे सांगून डॉ. कोल्हे म्हणाले की, मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यास प्राधान्य देण्यासाठीचे माझे प्रयत्न असून या शिबिरात तपासणी अंती पात्र ठरलेल्या ज्येष्ठ नागरिकांना स्टार्की फाउंडेशन अमेरिका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या सहकार्यातून अतिशय अत्याधुनिक अशा डिजिटल श्रवणयंत्राचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन खा. डॉ. कोल्हे यांनी केले आहे.
या शिबिराच्या आयोजनासाठी शिरूरचे आमदार अशोकबापू पवार, खेडचे आमदार दिलीप मोहिते, हडपसरचे आमदार चेतन तुपे, आंबेगावचे आमदार व राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील विलास लांडे, दत्ता साने तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x