मुंबई:पारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांनी मनगटावरील शिवबंधनाला जय महाराष्ट्र म्हणत मनगटावर राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलंय. यामुळे महाविकास आघाडीत राजकारण पेटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात महविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्यापूर्वीच पारनेर नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने जवळीक साधत सत्ता स्थापन केली होती. मात्र राष्टवादी सोबतची ही मैत्री आता शिवसेनेलाच भोवल्याचं दिसतंय.
या प्रकारानंतर शिवसेनेत तीव्र नाराजी उमटली. शिवसेना नेत्यांकडून आमचे नगरसेवक परत करा. असा निरोप देखील अजित पवारांना पाठवल्याची चर्चा होती. दरम्यान, यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पारनेरचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले, याचा अर्थ ते अजित पवारांनी फोडले असा होत नाही. ते पूर्णपणे स्थानिक राजकारण आहे. मुख्यमंत्र्यांचं सर्व बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष आहे. मुंबई पोलिसातील बदल्यांचं कुणी राजकारण करु नये, त्यावरुन काही वाद नाही.
महाविकास आघाडीत समन्वय समिती आहे. त्यात तिन्ही पक्षाचे दोन-दोन प्रमुख नेते आहेत. कोरोनामुळे संवाद कमी झाला आहे, मात्र तिन्ही पक्ष एकत्रपणेच चर्चा करुन निर्णय घेतात, थोरातांनीही परखडपणे आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे राऊत म्हणाले.