पुणे

मंगळवारी तब्बल ५७४९ करोना चाचण्यांची नोंद : १.७१ लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडला

पुणे : शहरात मंगळवारी तब्बल ५७४९ करोना चाचण्यांची नोंद झाली. करोना विषाणू संसर्गाची सुरुवात झाल्यानंतर एकाच दिवसात करण्यात आलेल्या सर्वाधिक चाचण्या अशी या संख्येची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांच्या संख्येनेही १.७१ लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच, मोठय़ा प्रमाणावर चाचण्या करण्यात येत असल्यामुळे रुग्णसंख्याही मोठी आहे, मात्र संसर्ग साखळी रोखण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

करोना विषाणू संसर्गाचे रुग्ण शहरात तसेच राज्यात आढळण्यास सुरुवात झाली, त्यावेळी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ही करोना निदान चाचण्या करणारी एकमेव प्रयोगशाळा होती. मात्र, संसर्ग वाढण्याचा धोका विचारात घेऊन ससून रुग्णालयात करोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. तसेच, खासगी प्रयोगशाळांनाही करोना चाचण्यांची परवानगी देऊन चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली. त्यामुळे दिवसाला २००-३०० चाचण्यांपासून पाच हजार चाचण्यांपर्यंतचा मोठा पल्ला गाठणे शक्य झाले आहे. कमीत कमी वेळात, परवडणाऱ्या किमतीत रोगाचे अचूक निदान करणाऱ्या रॅपिड अँटिजेन चाचण्याही शहरात सुरू करण्यात आल्याने चाचण्यांचे अहवालही लवकरात लवकर उपलब्ध होणे शक्य झाले आहे. त्यामुळे करोना चाचण्यांबाबत शहराने निर्माण के लेल्या पायाभूत सुविधा हा करोना काळातील कौतुकाचा विषय ठरत आहे.

चाचण्यांचा वेग कायम ठेवणे महत्त्वाचे

राज्याचे निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, शहरातील मोठय़ा संख्येने होणाऱ्या चाचण्या ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.   टाळेबंदीच्या काळातही चाचण्यांची संख्या अशीच कायम राहिली तर करोना रुग्ण आणि वाहकांना लवकरात लवकर विलग करणे सोपे होणार आहे. त्यासाठी चाचण्यांचा वेग कमी न करता उलट शक्य असल्यास तो वाढता ठेवणेच हिताचे ठरणार आहे. तशा सूचनाही आरोग्य विभागाला करण्यात आल्या आहेत, असे डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट के ले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x