पुणे

मार्केट यार्डातील भाजीपाला, फळ, कांदा-बटाटा विभागाचे कामकाज नियमित सुरू

पुणे : मार्केट यार्डातील भाजीपाला, फळ, कांदा-बटाटा विभागाचे कामकाज मंगळवारपासून (21 जुलै) नियमित सुरू झाले. मुख्य बाजारासह मोशी, खडकी, उत्तमनगर, मांजरी येथील उपबाजारात भाजीपाल्यांची आवक झाली. लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याचे भाव कडाडले होते. भाजीपाला बाजार सुरू झाल्याने भाज्यांचे भाव आटोक्‍यात येण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन लागू केल्यानंतर मार्केटयार्डातील सर्व विभागाचे कामकाज बंद करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर सोमवारपासून (20 जुलै) गूळ-भुसार विभागाचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर मंगळवारपासून भाजीपाला, फळ, कांदा-बटाटा विभागाचे कामकाज सुरू झाले. मात्र, फूलबाजार शुक्रवारपर्यंत (24 जुलै) बंद राहणार आहे.

मंगळवारी भुसार बाजारात 129 गाड्यांमधून 19 हजार क्विंटल एवढी अन्न धान्याची आवक झाली. भाजीपाला विभागात पहिल्याच दिवशी लहान मोठ्या 700 गाड्यांमधून 18 हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली. उपबाजारात एकूण मिळून 300 गाड्यांमधून 3 हजार क्विंटल एवढी भाजीपाल्याची आवक झाली.

भाजीपाला, भुसार बाजाराची वेळ लॉकडाऊन संपेपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 अशी निश्‍चित करण्यात आली आहे. व्यापारी, अडते, कामगार वर्गाने बाजाराची वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर शुक्रवारी बाजाराच्या कामकाजाच्या सुधारित वेळेबाबत प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येईल.

तसेच, लॉकडाऊनमुळे शहरात भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. मागणीच्या तुलनेत आवक अपुरी पडल्याने भावही वाढले होते. भाजीपाला बाजार सुरू झाल्याने भाव नियंत्रणात येतील, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x