पुणे

शहरात ऑनलाइन फसवणुकीचे सत्र वाढले : तिघांना पावणेतीन लाख रुपयांचा गंडा

पुणे : शहरात ऑनलाइन फसवणुकीचे सत्र वाढले असून चोरटे वेगवेगळ्या प्रकारची आमिषे तसेच बतावणी करून सामान्यांना गंडा घालत आहेत. सायबर चोरटय़ांनी बतावणी करून तिघांना पावणेतीन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.

एका अ‍ॅपद्वारे मित्राचे मोबाइल बिल अदा करणाऱ्या युवकाला चोरटय़ाने ७७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरटय़ाने ऑनलाइन पद्धतीने युवकाच्या खात्यातून ७७ हजारांची रोकड लांबविली. पर्वती भागातील एका युवकाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

१९ मार्च रोजी तक्रारदार युवकाला मित्राने मोबाइल बिल ऑनलाइन पद्धतीने (रिचार्ज) जमा करण्याची विनंती केली. त्यानंतर युवकाने ३९९ रुपये जमा केले. मात्र, मोबाइल रिचार्ज न झाल्याने युवकाने जमा केलेले पैसे परत करण्यासाठी मोबाइल कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राच्या नावे असलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा ग्राहक संरक्षण केंद्रातून बोलत असल्याची बतावणी करणाऱ्या चोरटय़ाने युवकाला ‘एनी डेस्क’नावाचे अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले.

चोरटय़ाने युवकाच्या डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर चोरटय़ाने युवकाच्या बँक खात्यातून ७७ हजार रुपये स्वत:च्या खात्यात जमा केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे तपास करत आहेत.

ऑनलाइन उत्पादने विक्री करणाऱ्या कंपनीकडून परतावा देण्यात येणार असल्याच्या बतावणीने विमाननगर भागातील एका युवतीला सायबर चोरटय़ाने १ लाख २७५ रुपयांचा गंडा घातला. याबाबत युवतीने विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवतीला गेल्या महिन्यात चोरटय़ाने परतावा देण्याच्या आमिषाने वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. चोरटय़ाने गेल्या महिन्याभरात युवतीकडून १ लाख २७५ रुपये बतावणी करून उकळले. पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे तपास करत आहेत.

‘पेटीएम’च्या बतावणीने फसवणूक सुरूच

पेटीएम अ‍ॅप अद्ययावत करण्याच्या बतावणीने फसवणुकीचे सत्र कायम आहे. कोरेगाव पार्क भागातील एका युवकाकडे बतावणी करून चोरटय़ांनी बँक खात्यातून ९९ हजार १९८ रुपये लांबविले. युवकाने याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार युवकाच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञाताने दोन दिवसांपूर्वी संपर्क साधला होता. तुझी आई पेटीएम अ‍ॅप वापरत असून तिचे खाते अद्ययावत न केल्यास बंद पडेल, अशी बतावणी चोरटय़ाकडून करण्यात आली होती. त्यानंतर चोरटय़ाने तक्रारदार युवकाच्या आईच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. टिम व्ह्य़ुअर, क्विक सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर चोरटय़ांनी तक्रारदार युवकाच्या आईच्या खात्यातून रोकड लांबविली. पोलीस निरीक्षक संतोष बर्गे तपास करत आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x