पुणे

संततधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा दुप्पट झाला

पुणे : गेल्या आठ दिवसांत धरण क्षेत्रांत झालेल्या संततधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा दुप्पट झाला आहे. गेल्या सोमवारी (३ ऑगस्ट) धरणांमध्ये ९.८२ अब्ज घनफू ट (टीएमसी) पाणीसाठा होता.  या सोमवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल १८.१३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आठ दिवसांत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पुणे शहराला पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा झाला आहे.

जूनच्या पहिल्या आठवडय़ात ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र, पावसाने दडी मारली होती. संपूर्ण जुलै महिन्यातही धरण क्षेत्रांत समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शहरात पुन्हा पाणीकपात करण्याबाबतही गेल्या आठवडय़ात ४ ऑगस्ट रोजी जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासन यांची बैठक झाली होती. त्यानुसार उपलब्ध पाणीसाठय़ाचे पुन्हा नव्याने नियोजन करण्यात येणार होते. मात्र, ३ ऑगस्टच्या रात्रीपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेला संततधार पाऊस आतापर्यंत कायम आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत पडलेल्या दमदार पावसामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला आहे.  दरम्यान, सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघर धरण परिसरात २५ मिलिमीटर, वरसगाव, पानशेत धरण परिसरात अनुक्रमे ११ व १४ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात चार मि.मी. पाऊस झाला.

आठ दिवसांतील पाणीसाठा टीएमसी

धरण                  आठ दिवसांपूर्वीचा पाणीसाठा        सध्याचा पाणीसाठा

टेमघर                 ०.७५ (२०.१२)                             १.५९ (४२.८०)

वरसगाव             ४.१८ (३२.५८)                             ७.३३ (५७.१७)

पानशेत               ४.२४ (३९.७८)                             ७.३५ (६९.००)

खडकवासला       ०.६६ (३३.२१)                              १.८७ (९४.७९)

एकूण                  ९.८२ (३३.६७)                              १८.१३ (६२.२१)

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x