पुणे

जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन काटेकोरपणे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

पुणे,दि. 11 : जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचविण्यात तसेच उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्‍पष्‍ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
पुण्यातील विधानभवनाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीची आढावा बैठक’ झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त कृष्‍ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे आणि पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी कोरोना बाधित रुग्ण दाखल होत आहेत. कोरोनाच्या रुग्णांना वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण क्षमतेने काम करावे. कोरोना परिस्थती नियंत्रणासाठी राज्य शासन सर्व प्रकारे मदत करत असून दोन्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील सक्रियपणे काम करावे. पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी विभागीय आयुक्तांनी नियोजनबध्द कार्यवाही करावी. विभागातील पाचही जिल्ह्यात कोरोनाविषयक काम करताना एकाच अधिकाऱ्यावर कामाचा ताण येऊ नये तसेच कामात गतीमानता येण्याच्या दृष्टिने विषयनिहाय जबाबदाऱ्या सोपवून कामाचे विकेंद्रीकरण करावे, असे त्‍यांनी सांगितले. विभागातील कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागू नये, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. ऑक्सिजन टँकरचा वाहतुकी दरम्यानचा वेळ वाचवण्यासाठी तसेच रुग्णालयात जलदगतीने ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी ऑक्सिजन टँकरला ॲम्ब्युलन्स प्रमाणे सायरनची व्यवस्था करुन घ्यावी. तसेच पोलीस विभागाने ऑक्सिजन टँकर मार्गस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरुन हे टँकर वाहतूक कोंडीतून जलदगतीने बाहेर पडतील.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील 50 टक्के निधी कोविड नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी वापरुन कोरोना रोखण्‍यासाठी प्रभावीपणे काम करावे, असे सांगून ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत उपचार मिळवून देण्याचे नियोजन करावे तसेच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना रुग्णांवर उपचार होत असल्याची खात्री करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती लोकप्रतिनिधींसह रुग्ण व सर्वसामान्यांना मिळण्यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत नोंदी करण्याबरोबरच बेड उपलब्ध करुन देण्याचे नियोजन दोन्ही महापालिकांनी करावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 सप्टेंबर पासून राज्यभर ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावांमधील दक्षता समित्या व स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे. हे अभियान सर्वांनी मिळून प्रभावीपणे राबवूया, असे आवाहनही त्यांनी केले.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे शहरात गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेडची गरज भासत आहे, यासाठी आणखी बेड वाढविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे विभागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जमाबंदी आयुक्त तथा ससूनचे समन्‍वय अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णांलयातील व्यवस्थापन व उपचार पध्दतीची माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तसेच बेड व्यवस्थापनाच्या दृष्टीने तालुकानिहाय नियोजन करण्यात आल्याची आणि तपासण्या वाढविण्यात आल्याची माहिती दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद, विशेष कार्य अधिकारी कौस्‍तुभ बुटाला तसेच उपस्थित अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x