सातारा

साताऱ्यातील जोर-जांभळी, मायणी वनक्षेत्रांना विशेष दर्जा.

सातारा : बिबटे, कोल्हे-रानकुत्री, अस्वले, विविध पक्षी आणि दुर्मीळ वनौषधींमुळे पर्यटक आणि जिज्ञासूंचे आकर्षण केंद्र असलेल्या वाई तालुक्यातील जोर-जांभळीच्या खोऱ्यास तसेच फ्लेमिंगो पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या मायणी तलावासह सर्व परिसरास समूह पक्षी संवर्धन राखीव आणि ‘संवर्धन राखीव वनक्षेत्रा’चा (कॉन्झव्‍‌र्हेशन रिझव्‍‌र्ह) दर्जा मिळाला आहे.

मायणी तलावासह येराळवाडी, कानकात्रे आणि सूर्याची वाडी तलाव या क्षेत्रास समूह पक्षी संवर्धन राखीव, तर वाई तालुक्यातील जोर आणि जांभळीच्या खोऱ्यास संवर्धन राखीव वनक्षेत्रा’चा दर्जा बहाल करण्यात आल्याची माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेट बेन यांनी दिली. सातारा जिल्ह्य़ातील जोर-जांभळी, मायणी या वनक्षेत्रांना ‘संवर्धन राखीव’चा दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘राज्य वन्यजीव मंडळा’च्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

* महाबळेश्वरच्या वन क्षेत्राला हा भाग सलग जोडून असल्याने त्याच्या संवर्धनाची मागणी वनप्रेमी करीत होते.

खटाव तालुक्यातील मायणी तलावालगतचे वन विभागाचे क्षेत्र ‘मायणी पक्षी अभयारण्य’ या नावाने संबोधले जात होते. मात्र, कागदोपत्री त्याला कोणताही आधार नव्हता. त्यामुळे हे क्षेत्र संरक्षित होण्याची गरज होती. त्या दृष्टीने साताऱ्यातील पर्यावरणाचे अभ्यासक सुनील भोईटे यांच्या सहकार्याने वन विभागाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला होता. नव्या मायणी समूह पक्षी संवर्धन राखीवमध्ये पक्ष्यांचे आश्रयस्थान संवर्धित होणार आहे.

* मानवी हस्तक्षेप रोखणार.

संवर्धन राखीवच्या दर्जामुळे वन्यजीव आणि पक्षी संवर्धनासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या क्षेत्राचे संरक्षण आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने स्थानिकांच्या सहभागातून संयुक्त वन व्यवस्थापन समिती नेमता येईल. तसेच मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी पावले उचलली जातील असे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर वन विभागाचा सह्य़ाद्रीमधील एकूण ७ वनक्षेत्रांना ‘संवर्धन राखीव वनक्षेत्रा’चा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला आहे. सह्य़ाद्रीमधील एकूण ८६ हजार ५५४ हेक्टर वनक्षेत्राला संरक्षणाचा दर्जा मिळाला आहे. याशिवाय साताऱ्यातील पक्षी अधिवासाकरिता महत्त्वाच्या असणाऱ्या ‘मायणी’ वनक्षेत्रालाही (८६६ हे) ‘कॉन्झव्‍‌र्हेशन रिझव्‍‌र्ह’चा दर्जा देण्यास मान्यता मिळाली आहे.

* वन्यजीव भ्रमणमार्ग जोडण्यास मदत.

साताऱ्यातील जोर-जांभळी (६,५११ हेक्टर), कोल्हापूरमधील विशालगड (९,३२४ हे.), पन्हाळा (७,२९१ हे.), गगनबावडा (१०,५४८ हे.), आजरा-भुदरगड (२४,६६३ हे.), चंदगड (२२,५२३ हे.) आणि सिंधुदुर्गमधील आंबोली-दोडामार्ग (५,६९२ हे.) येथील वनक्षेत्रांना संवर्धन राखीवचा दर्जा मिळाला आहे. साताऱ्यातील जोर-जांभळीपासून सिंधुदुर्गातील ‘तिलारी संवर्धन राखीव वनक्षेत्रा’पर्यंत ‘सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पा’चा वन्यजीव भ्रमणमार्ग जोडला जाण्यास मदत झाली आहे, अशी प्रतिक्रिया साताऱ्याचे माजी मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी व्यक्त केले.

नव्या वर्षांत जोर-जांभळी आणि मायणी येथे पर्यटनवाढीबरोबरच स्थानिकांसाठी रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. विशेष म्हणजे या दर्जानंतर खासगी जागा संपादन अथवा कोणतीही जादा जाचक बंधने स्थानिकांवर पडणार नाहीत. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील असतो. मात्र निधी, साधनसामग्रीची कमतरता यामुळे अशा प्रकारच्या प्रयत्नांवर मर्यादा पडतात. या वन्यजीवांसाठी त्याच्या अधिवासात कुरण विकासाच्या माध्यमातून खाद्यनिर्मिती, पाणवठे बांधले तर हे प्राणी मानवी वस्तीकडे वळणार नाहीत, असेही भोईटे यांनी सांगितले.

* वैशिष्टय़े.

वाईपासून सुमारे २५ किलोमीटरवर, सातारा-पुणे जिल्ह्य़ाच्या हद्दीवर जोर आणि जांभळीचे खोरे आहे. त्यांचे सुमारे ६ हजार ५११ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. या भागात वन्यप्राणी भरपूर आहेत. विशेषत: रानकुत्र्यांची संख्या अधिक आहे. मात्र हे वन्यजीव आजपर्यंत दुर्लक्षित होते. जांभळी वनक्षेत्र प्राणी, पक्षी, वनस्पतींचे आश्रयस्थान आहे. अनेक प्राणी आणि पक्षी या भागात आढळतात. जोर जांभळी संवर्धन राखीव क्षेत्र घोषित झाल्याने येथे आढळणाऱ्या दुर्मीळ वनौषधी, वन्यप्राणी, पक्षी यांचे संवर्धन प्राधान्याने केले जाईल. स्थानिक लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. स्थानिकांना या संवर्धन राखीव जोर-जांभळी यांचा फायदाच होईल, असे सांगण्यात येत आहे.

* पक्षी .

* मोर, रानकोंबडय़ा, स्वर्गीय नर्तक, कोकिळा, घुबड, कोतवाल, हरियल, शिकरा, बनेश, संख्या, हळगया, सुतार, बुलबुल, भारद्वाज, धोबी, पाटय़ा, साळुंखीस दयाळ, मैना, टिटवी, सर्पगरुड, पांढरा बगळा इ.

* वृक्ष – भूल, पारजांभूळ, अंजाली, सिरहा, कुमा, नाना, भोमा, ऐन, फणसी, किंजळ, पांगारा, काटेसाबर, शिवन, वावडिंग, माकटीन, वारस, विटा, गेळा, पायर, बकुळ, कढीपत्ता, आंबा, तंबर, बांबू, चिया, कारवी इ.

* गवत- पवन्या, मारवेल, कुसळ, तुरी, रोखा, मोरकट इ.

* झुडपे- कारवी, नेचा, चिमट, आंबुळकी, घाणेरी, करवंद ’वेली- कावळी, नांदवेली, बेदकी, पापाणी

* वन्यप्राणी .

बिबटे, भेकर, रानडुक्कर, अस्वल, वानर, माकड, ससा, खवले मांजर, साळींदर, कोल्हा, रानकुत्रे, गवे, मुंगुस, शेकरू, सांबर, पिसाटी, उदमांजर, पीलिंगा, खार इत्यादी.

* सरपटणारे प्राणी .

नाग, घोरपड, घोणस, फुरसे, अजगर, दिवड, धामण, हरणटोळ.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x