पुणे

अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गोळ्या घालून हत्या, तळेगाव दाभाडे येथील धक्कादायक घटना,

पुणे: अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलाची गोळया झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव दाभाडे ( ता. मावळ) पोलीस ठाण्याच्याजवळ असलेल्या नॅशनल हेवी इंजीनियरिंग कंपनीजवळ उघडकीस आला आहे. ही घटना बुधवारी (ता. 23 )मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

दशांत अनिल परदेशी ( वय 17 रा. तळेगांव दाभाडे ,. ता.मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अनिल परदेशी यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दशांत परदेशी बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बाहेर गेला होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. दशांत कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी शोधकार्य सुरू केले असता, दशांतचा नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनी जवळ मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्याला गोळी लागलेली होती.
दशांत वर हल्ला कोणी व का केला याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस कसून तपास करत आहे.