पुणे

रस्त्यांची दुर्दशा आणि भाजपची तारीख पे तारीख काँग्रेस करणार आंदोलन – माजी आमदार मोहन जोशी

पुणे : मध्यवस्तीतील रस्त्यांची खोदकामाने दुर्दशा झाली असून दुरुस्तीसाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी तारीख पे तारीख देत आहे. यात पुणेकरांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. भाजपच्या या निष्क्रीयतेविरोधात काँग्रेस पक्ष व्यापक आंदोलन करणार आहे, असे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी जाहीर केले आहे.

शहराच्या मध्यवस्तीतील रस्ते खोदाईमुळे गेले ४ महिने बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आदी रस्ते आणि त्याला जोडले जाणारे छोटे रस्ते यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होते आहे, शिवाय खोदाईनंतर दुरुस्ती लांबल्याने पेठांमधील रहिवाशांना मनस्ताप सोसावा लागत आहे. रस्त्यांची दुर्दशा झाल्याने रहिवाशांमध्ये असंतोष आहे. हा असंतोष व्यक्त करण्यासाठी आंदोलन करून भाजपच्या कारभाराविरोधात निषेध नोंदविला जाईल, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मध्यवस्तीतील सदाशिव पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ अशा पेठांमध्ये खोदकामे होऊन रस्ते दुरुस्तीची कामे रखडली आहेत. लक्ष्मी रस्त्यावर पाईपलाईनच्या कामासाठी खोदाई केली आणि नंतर डागडुजी निकृष्ट दर्जाची केल्याने बाजारपेठेतील या रस्त्याची रया गेली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी आधी डिसेंबर अखेर, त्यानंतर २० जानेवारी आणि आता आणखी १५ दिवस लागतील अशा वेगवेगळ्या तारखा रासने यांनी दिल्या आहेत. तारीख पे तारीख देण्यातच ते मश्गुल आहेत, प्रशासनावर काहीही नियंत्रण नाही. गेल्या५ वर्षात भाजपला मोठे प्रकल्प पूर्ण करण्यात यश आले नाही आणि छोटी छोटी नागरी सुविधांची कामेही करता आलेली नाहीत, शहराचा खेळखंडोबा करून टाकला,अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.