पुणे ः अरेरे… काय हे… जीवंतपणी असुरक्षितता वाढत असताना मेल्यानंतरही लचकेतोड झाल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. ७ मार्च) रोजी घडला. त्यापूर्वी बुधवारी (५ मार्च) रामटेकडी येथील दफनभूमीतून एक दिवसाचे अर्भक गायब झाले. हा प्रकार पाहून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. हडपसरमधील अमरधान स्मशानभूमीमध्ये जळालेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडल्याचा व्हीडिओ सोशल मीडिायवर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. हडपसरमधील अमरधान स्मशानभूमीतील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका प्रशासनाने सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसवावेत, अशी मागणी मोहन लाल बलाई, सुरेश हिंगणे, रणजीत चव्हाण नागरिकांनी केली आहे.
हडपसरमध्ये चोऱ्या-मारामाऱ्या खून, दरोडे, बलात्कार, अत्याचाराच्या घटनेनंतर आता मेल्यानंतरही अमरधाम स्मशानभूमीमध्ये मृतदेहाचे कुत्रे लचके तोडत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आहे. मागिल आठवड्यात रामटेकडी येथील दफनभूमीतून एक दिवसाचे अर्भक गायब झाले. त्यानंतर हडपसरमधील स्मशानभूमीतील मृतदेहाचे कुत्र्याने लचके तोडले. त्यामुळे स्मशानभूमीधील पालिका प्रशासनाने नेमलेल्या सुरक्षा रक्षकांच्या कामकाजाविषयी आता नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे. या घटनेला जे कोणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करून निलंबित केले पाहिजे, असे मयूर फडतरे यांनी सांगितले.
समता परिषदेचे पुणे शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर म्हणाले की, हडपसर स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी पालिकेचे उपायुक्त आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त यांच्याकडे १५ दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे कली आहे. स्मशानभूमीमध्ये पाणी व्यवस्था, रॅम्प दुरुस्ती, स्वच्छतागृह दुरुस्ती, सीमाभिंत बांधणे याबाबत पत्र व्यवहार केला आहे. येथे मागिल १५ वर्षापासून एक खासगी लाकडाची वखार अनधिकृत आहे. त्याबाबत ही पत्र दिले आहे. त्याची संपूर्ण चौकशी करून पालिका प्रशासनाने कारवाई करावी, असे त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.
रमेश जगताप म्हणाले की, हडपसरमधील अमरधान स्मशानभूमीमध्ये खासगी कंत्राटदाराचे पाच ऑपरेटर असून, ते पास घेण्यासाठीसुद्धा थांबत नाहीत. ते कागदोपत्री दाखवले जात असून, त्याची शहानिशा केली जात नाही. डिसेंबरमध्ये कुत्र्याने जळालेल्या मृताचे अवयवाचे लचके तोडल्याचा प्रकार घडला आहे. अंत्यविधीनंतर मृतदेह संपूर्ण जळेपर्यंत स्मशानभूमीतील कर्मचारी यांची जबाबदारी असते. ते कर्मचारी नक्की काय करतात. हे पाहणे गरजेचे आहे.
हडपसर स्मशानभूमी मध्ये सुरक्षा रक्षक पुरवण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे, मनुष्यबळ कमी असल्याने 24 तास सुरक्षारक्षक नसतात या संदर्भात पत्रव्यवहार झालेला आहे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत अजून काही बसवण्याची गरज आहे, स्मशान भूमीत घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर अहवाल करून वरिष्ठांना कळविला जाईल.
बाळासाहेब ढवळे पाटील
पालिका सहायक आयुक्त – हडपसर