अमरावती (प्रतिनिधी)
कसबेगव्हाण येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेत विधवा कृप्रथा बंद करण्याबाबत एकमताने ग्रामस्थांनी ठराव मंजूर केला आहे.राज्यातील हेरवाड पाठोपाठ जिल्ह्यातील कसबेगव्हाण ग्रामपंचायत ही विधवा प्रथा बंद करणारी प्रथम ग्रामपंचायत ठरली आहे.ग्रामपंचायत च्या या निर्णयाला ग्रामस्थांनी एकमताने मंजुरी देऊन एक आदर्श निर्माण केला आहे.
कसबेगव्हाण ग्रामपंचायत येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच शशिकांत मंगळे होते. प्रथम ग्रामविकास अधिकारी नरेश भरसाकळे यांनी स्वागत व प्रास्तविक करुन मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचुन दाखविले.गावातली विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी सौ. लीलाबाई गजानन डिके यांनी ग्रामसभेपुढे प्रस्ताव मांडला याला सरपंच शशिकांत मंगळे यांनी अनुमती देत विधवांना समाजात सन्मानाची वागणुक मिळावी म्हणुन ऐतिहासिक निर्णय घेत ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यामाध्यमातून सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीत कसबेगव्हाण नेहमी अग्रेसर राहील असा कृतिशील संदेश ग्रामसभेने दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात हेरवाड पाठोपाठ कसबेगव्हाण मध्येही विधवा प्रथा बंद करण्यात आली आहे. विधवा प्रथेमुळे पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र काढणे, हातातील बांगड्या फोडणे व पायातील जोडवे काढणे असे अमंगल कृत्य विधवा महिलेच्या बाबतीत केले जाते तसेच विधवा महिलेला कोणत्याही धार्मिक सामाजिक कार्यक्रमात डावलले जाते या प्रथेमुळे महिलांच्या हक्कांवर व अधिकारांवर गदा येते व मानवी कायद्याचा भंग होतो तरी विधवा महिलांना इतर सर्व सामान्य महीलांप्रमाने जीवन जगता यावे म्हणुन विधवा प्रथा बंद करण्यात यावी असा ठराव मंजूर केला आहे.
गावातली विधवा प्रथा बंद ठराव मंजूर केल्याने सर्व ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होेत होते व या ऐतिहासिक निर्णयला समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी उपसरपंच अमोल घुरडे ग्रामपंचायत सदस्य राधिका हिवराळे, शागिराबी अता मोहम्मद, शारदा दामले, प्रशात दामले, रेखा हंबर्डे, ऋषाली चित्रकार, सुधाकर शिंगणे, मो.वासिक शे महेमुद, पदमा मोरे, विजया ठाकरे व वैभव झटाले यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.