“गांधींची हत्या नथुरामनेच केली, हे संघाने छातीठोकपणे सांगायला हवे होते; पण संघाने घाबरून पळ काढला”–गोपाळ गोडसे

Rokhthok Maharashtra 8 0

पुणे- पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयाचे न्यायाधीश श्री.अमोल श्रीराम शिंदे यांच्यासमोर लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांच्याविरुद्ध स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित बदनामी प्रकरणी सुरू असलेल्या फौजदारी खटल्यात फिर्यादी श्री. सात्त्यकी सावरकर यांचा उलट तपास सुरू असून राहुल गांधी यांचे वकील ॲड.मिलिंद दत्तात्रय पवार उलट तपास घेत आहेत.
उलट तपासणीदरम्यान महात्मा गांधी हत्येतील आरोपी नथुराम गोडसेचा सख्खा भाऊ व फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे आजोबा गोपाळ गोडसे यांनी महात्मा गांधी हत्येतील जन्मठेपेची शिक्षा भोगून आल्यानंतर पुण्यातील त्यांच्या घरी ते हयातीत असताना दिलेल्या मुलाखतीची चित्रफिती न्यायालयात फिर्यादीला दाखविण्यात आले. तीनही चित्रफिती फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी मान्य केल्या.
मुलाखतीमध्ये गोपाळ गोडसे यांच्यासोबत आजी सिंधू गोडसे दिसत असल्याचे फिर्यादीने मान्य केले. तसेच गोपाळ गोडसे आणि सिंधू गोडसे यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे ज्ञान होते, हेही मान्य करण्यात आले.
उलट तपासणीमध्ये गोपाळ गोडसे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वाला दिशा दिली, असे मत व्यक्त केल्याचा संदर्भ घेण्यात आला. त्यावर सत्त्यकी सावरकर यांनी हे गोपाळ गोडसेंचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून त्यावर आपल्याला भाष्य करायचे नसल्याचे स्पष्ट केले.
याच मुलाखतीत हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ यांच्या भूमिकांमध्ये साम्य असल्याचे गोपाळ गोडसे यांनी सांगितल्याचा संदर्भही उलट तपासणीमध्ये घेण्यात आला. त्यावरही फिर्यादीने ते गोपाळ गोडसेंचे वैयक्तिक मत असल्याचे सांगितले.
गोपाळ गोडसे यांनी मुलाखतीत, ज्या ठिकाणी हिंदू महासभेच्या शाखा होत्या, त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा स्थापन होत असत, असा दावा केल्याचा संदर्भही न्यायालयासमोर आला. याबाबतही फिर्यादीने “ते माझ्या आजोबांचे वैयक्तिक मत आहे; त्यावर मी भाष्य करू शकत नाही,” असे उत्तर दिले.
नथुराम गोडसे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध चित्रफिती द्वारे मुलाखतीतून ॲड. मिलिंद पवार यांनी गोपाळ गोडसे यांच्या तीन स्वतंत्र चित्रफितीतून संदर्भ न्यायालयासमोर आणला.
त्यामध्ये नथुराम गोडसे यांचा हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेला कथित संबंध, तसेच गांधी हत्या प्रकरणानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नथुराम गोडसेपासून अंतर घेतल्याच्या दाव्याबाबत गोपाळ गोडसे यांनी व्यक्त केलेली मते असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
मुलाखतीमध्ये नथुराम गोडसे यांनी गांधी हत्येनंतर “मी संघाला सोडून दिले आहे” असे लिहून दिल्याचा दावा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ते लिहून घेतल्याच्या कथित संदर्भावरही उलट तपासणी करण्यात आली. या विशिष्ट बाबी बाबत मुलाखतीत स्पष्ट उल्लेख नसल्याचे फिर्यादीकडून सांगण्यात आले.
न्यायालयात दाखल केलेल्या चित्रफित मुलाखतीत वाजपेयी हा ढिल्ला माणूस होता असे सांगितले. तसेच मुसलमान हज यात्रेला गेल्यावर तिथे दाऊद इब्राहीमला भेटतात व बाॅम्ब बनविण्याचे साहित्य भारतात घेऊन येतात. मुस्लिम महिलांनी भारतात बुरखा परिधान करून नये असे गोपाळ गोडसे म्हणाले असून सात्यकी सावरकर यांना चित्रफित मान्य असल्याबाबत न्यायालयासमोर अर्ज दाखल करुन त्यांनी कबूल केले आहे.
तसेच गांधी हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नथुराम गोडसेपासून अंतर ठेवल्याच्या कृतीवर तिव्र नाराजी व्यक्त करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने “हो नथुराम गोडसे आमचाच सेवक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिवाय गांधी हत्येसारखे काम फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सेवकच करू शकतो” असे छातीठोक पणे सांगायला हवे होते. असे मुलाखतीत गोपाळ गोडसे यांनी सांगितले असून ती चित्रफित सात्यकी सावरकर यांना मान्य असल्याबाबत न्यायालयासमोर अर्ज दाखल करुन कबूल केले आहे.
दरम्यान, फिर्यादी सात्त्यकी सावरकर यांचे वकील ॲड.संग्राम कोल्हटकर यांनी “गोपाळ गोडसे यांच्या मुलाखतींचा सदर खटल्याशी संबंध नाही,” असा आक्षेप नोंदवला. न्यायालयाने सदर आक्षेपांचा अंतिम निर्णय खटल्याच्या अंतिम निकालाच्या वेळी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.
न्यायालयीन कामकाजामुळे आजची सुनावणी तहकूब होऊन या प्रकरणातील उलट तपासणी अद्याप सुरू असून पुढील सुनावणी ३० सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.
राहुल गांधी यांच्या वतीने ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांना ॲड. ज्ञानेश्वरी जाधव, अ‍ॅड. सुयोग गायकवाड, ॲड. रेणुका बाठे आणि ॲड.कैलास जिरे हे सहकार्य करीत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.