शिक्षण दिना प्रित्यर्थ सर्व गुरुजनांना विनम्रपणे अभिवादन
आपल्या आयुष्यात आपले प्रथम गुरु हे आई आणि वडील जे आपल्यावर चांगले संस्कार घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल राहून आपले भवितव्य उज्ज्वल करतात. आपले दुसरे गुरु जे आपल्याला ज्ञान देतात. आपल्या शिक्षणाचा पाया मजबूत बनवितात ते आपले “शिक्षक”. ते आपले आयुष्य शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनविण्यासाठी सतत प्रयत्न करतात. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. त्यांना विनम्र अभिवादन करण्याचा हा दिवस म्हणजे “शिक्षक दिन”.
दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ‘गुरु’ यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असतं. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणात विश्वास ठेवत असून ते एक महान दार्शनिक आणि शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण विद्यमान होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं.
आज काही अंशी शिक्षणाचा बाजार झाला असून ज्ञानाची बोली लावली जाते. वर्तमानात गुरु-शिष्य परंपरा कलंकित होत आहे. अनेकदा शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांशी तर विद्यार्थ्यांद्वारे शिक्षकांसोबत दुर्व्यवहार होत असल्याच्या बातम्या येत असतात. हे बघून मन अस्वस्थ होते. खरं तर विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांचे दायित्व आहे की या महान परंपरेला उत्तम रित्या समजून सुसंस्कृत समाज निर्माणात आपले सहयोग प्रदान करावे हे अपेक्षित असते.
आजूनही काहीं शिक्षक जीवाचे रान करून सक्षम व सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांचा यथोचित गौरव केल्या जातो हे नक्कीच अभिमानास्पद आहे. परंतु त्याही पेक्षा अशा ऋषितुल्य शिक्षकांना सर्वोतोपरी सहाय्य हवे आहे ते द्यायला हवे. कारण उत्कृष्ट पिढी घडविण्याचे काम शिक्षक करतात, त्यामुळे कोणत्याही शिक्षकांचे काम सोपे नाही. त्यांना समोरील विद्यार्थ्यांचा कल, क्षमता ओळखून त्या पध्दतीने शिकवावे लागते. सध्याची परिस्थिती अशी आहे की काही अपात्र विद्यार्थी घडविताना त्यांना शिक्षा करायची नाही अन् केली तर विद्यार्थी/पालक शिक्षकां विरुद्ध तक्रारी नोंदवतात. काही वेळा तर त्यांच्या शिक्षकी पेशावर गदा येते ! त्यामुळे आता “छडी लागे छम छम, विद्या येई घम घम” हे फक्त म्हणी पुरते शिल्लक आहे असे म्हणावे लागते.
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा कायम स्वरुपाचा आदर बाळगून त्यांच्या बद्दल दरवर्षी कृतज्ञता बाळगली पाहिजे, तसेच पालकांनी सुध्दा आपल्या पाल्यांमध्ये गुरुजनांच्या बद्दल तसा आदरभाव निर्माण करायला हवा. आजच्या शिक्षण दिना प्रित्यर्थ सर्व गुरुजनांना विनम्रपणे अभिवादन 🌹😊👏🏻
सुधीर उध्ववराव मेथेकर





