सहाय्यक फौजदार गणेश दाभाडे यांचा मृत्यू!
उरुळी कांचनजवळ भरधाव वाहनाची पोलिस कर्मचाऱ्याला धडक; सहाय्यक फौजदार गणेश दाभाडे यांचा मृत्यू!
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचनजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात सहाय्यक फौजदार गणेश दाभाडे, वय ४९, यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
शुक्रवारी १८ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर, ग्रीन पार्क हॉटेलजवळ हा अपघात झाला. गणेश दाभाडे हे उरुळी कांचन पोलिस ठाण्यातून बाहेर पडताना महामार्ग ओलांडत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
गणेश दाभाडे हे मूळचे धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथील रहिवासी होते. २००१ साली पोलिस दलात भरती झाल्यानंतर त्यांनी पुणे ग्रामीण पोलिस दलात सेवा बजावली. पौंड, वेल्हे, जेजुरी आणि सासवड पोलिस ठाण्यांमध्ये सेवा केल्यानंतर ते उरुळी कांचन पोलिस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते.
अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळी न थांबता फरार झाला. त्याचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. दाभाडे यांच्या निधनाने उरुळी कांचन पोलिस ठाण्यात शोककळा पसरली असून, शासकीय मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.





