माधुरी हत्तीणीची अखेर घरवापसी! 48 तासांचा प्रवास करून नांदणीत दाखल, कोल्हापूरकरांचा गुलालाने जल्लोष

Rokhthok Maharashtra 14 0

माधुरी हत्तीणीची अखेर घरवापसी झाली आहे!
“आमची माधुरी आम्हाला परत आणून द्या” अशी मागणी करणाऱ्या कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी अखेर नांदणीत दाखल झाली आहे.
गुजरातमधील वनतारा रेस्क्यू सेंटरमध्ये तिची देखभाल केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि तब्बल ४८ तासांचा प्रवास करून मुंबई आणि पुणेमार्गे माधुरी नांदणीत परतली.
माधुरीच्या आगमनाची बातमी मिळताच गावकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. ठिकठिकाणी स्वागताचे पोस्टर लावण्यात आले होते आणि माधुरी नांदणीत दाखल होताच कोल्हापूरकरांनी गुलाल उधळून जल्लोष केला.
माधुरीच्या आरोग्यासाठी नांदणीमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मोकळं वातावरण, मऊ वाळू, विशेष फ्लोअरिंग, पाण्यात व्यायामासाठी जलाशय आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
वनताराकडूनही माधुरीच्या आरोग्यासाठी आवश्यक सहकार्य मिळणार आहे. दरम्यान, हायपावर कमिटीच्या निर्देशानुसार माधुरीचा मिरवणूक, परेड, धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापर करता येणार नाही.
१८ वर्षांखालील मुलांना आणि अप्रशिक्षित व्यक्तींना तिच्याशी शारीरिक संपर्क करण्यासही मनाई आहे.
माधुरीची ही घरवापसी म्हणजे केवळ एका हत्तीणीचं पुनरागमन नाही, तर कोल्हापूरकरांच्या भावनिक नात्याचा विजय मानला जात आहे!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.