बसच्या गर्दीत सोन्याची चोरी.. PMPML बसमध्ये दागिने लंपास!
बसच्या गर्दीत चोरट्यांचा डाव! ज्येष्ठ दाम्पत्याच्या बॅगेतून सव्वा दोन लाखांचे सोन्याचे दागिने गायब!
गौरी-गणपतीच्या सणासाठी आपल्या मूळ गावी जाणाऱ्या ज्येष्ठ दाम्पत्याच्या बॅगेतून तब्बल २ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. ही चोरी PMPML बसमधील गर्दीचा फायदा घेत करण्यात आल्याचा संशय आहे.
सुभाष भिकोबा चांदगुडे, वय ६३, आणि त्यांच्या पत्नी कांचन चांदगुडे, वय ६०, हे आकुर्डीहून निगडी ते भेकराईनगर या ई-९० बसने बारामतीतील कार्हाटी येथे जाण्यास निघाले होते.
नाशिक फाटा येथे बसमध्ये पाच संशयित महिला चढल्या. यावेळी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर हडपसरमधील गाडीतळ येथे उतरल्यानंतर चांदगुडे दाम्पत्याला आपल्या बॅगेतील दागिन्यांची डबी गायब असल्याचे लक्षात आले.
चोरीला गेलेल्या ऐवजात अडीच तोळ्यांचे मनी मंगळसूत्र, दीड तोळ्यांचा डिझाईन नेकलेस आणि अर्धा तोळ्याचे कानातले झुबे यांचा समावेश आहे.
या प्रकरणी सुभाष चांदगुडे यांच्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बसमधील गर्दीत प्रवास करताना मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





