मगरपट्टा कोठीवर महिला कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात? बिगारीअभावी टेम्पोवर चढून कचरा भरावा लागतोय!
मगरपट्टा कोठीवर महिला कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात? बिगारीअभावी टेम्पोवर चढून कचरा भरण्याची वेळ!
पुणे महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या मगरपट्टा कोठीवर महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना धोकादायक पद्धतीने काम करावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
मगरपट्टा कोठीवर दररोज मोठ्या प्रमाणात कचरा संकलनाचे काम सुरू असते. येथे महिला स्वच्छता कर्मचारी देखील काम करतात. मात्र, कचरा वाहून नेणाऱ्या टेम्पोवर बिगारी उपलब्ध नसल्याने या महिला कर्मचाऱ्यांनाच टेम्पोवर चढून कचरा भरावा लागत असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, येथे मुकादम नेमण्यात आलेला असतानाही बिगारीचे काम मुकादमच करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. तर संबंधित कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचीही चर्चा आहे.
एकीकडे महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ असल्याचा दावा केला जातो, तर दुसरीकडे महिला कर्मचाऱ्यांना अशा धोकादायक पद्धतीने काम करण्याची वेळ का येते? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
या संदर्भात हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त कुणाल धुमाळे यांच्याशी संपर्क साधला असता, मगरपट्टा कोठीवर मुकादम देण्यात आला असून बिगारी त्यांचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचा दावा कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.
महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? महापालिका प्रशासन यावर अंकुश ठेवणार का? आणि मुबलक मनुष्यबळ असताना महिलांवर असा कामाचा भार का?
आता याकडे हडपसरचे नगरसेवक आणि महापालिका प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





