स्पाइसजेट विमानात प्रवाशांचा संताप! विमानातील तापमान वाढल्याचा प्रवाशांचा आरोप

Rokhthok Maharashtra 29 0

दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागल्याचा दावा समोर आला आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, विमानात बसल्यानंतर अचानक तापमान मोठ्या प्रमाणात वाढले. विमानातील उष्णता असह्य झाल्याने अनेक प्रवासी घामाने भिजले आणि काहींना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानात लहान मुलांसह ज्येष्ठ प्रवासीही होते.
प्रवाशांचा आरोप आहे की, अस्वस्थ परिस्थितीतही विमान रनवेवर नेण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी विमान उड्डाणाला विरोध केला. यावेळी काही प्रवाशांशी विमान कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
यानंतर विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आल्याचा दावा प्रवाशांनी केला. या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी विमानतळावरच ठिय्या आंदोलन केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून प्रवाशांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा झाला असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या दाव्यांबाबत स्पाइसजेट आणि संबंधित विमानतळ प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.