“पती ऑस्ट्रेलियात आहे” म्हणत 2 वर्षे फसवणूक; अखेर उघड झाले धक्कादायक सत्य!

Rokhthok Maharashtra 28 0

“पती ऑस्ट्रेलियाला गेला आहे,” असे तब्बल दोन वर्षे सांगत कुटुंबीयांची दिशाभूल करण्यात आली. मात्र दिराला संशय आल्याने उलगडलेले सत्य धक्कादायक ठरले. गुजरातमधील जामनगर येथे पत्नी आणि तिच्या कथित प्रियकरावर पतीची हत्या करून मृतदेह कारखान्याच्या जमिनीखाली पुरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जामनगरमधील या प्रकरणात पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराने पतीला सायनाइड देऊन हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह कारखान्याच्या परिसरात सुमारे १२ फूट खोल खड्डा खणून पुरण्यात आल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे.गेल्या दोन वर्षांपासून संबंधित महिला पती ऑस्ट्रेलियाला गेल्याचे सांगत कुटुंबीयांची दिशाभूल करत होती. मात्र, मृत व्यक्तीच्या दिराला संशय आला. त्याने पती ज्या ठिकाणी ऑस्ट्रेलियात काम करत होता त्या कार्यालयाचा पत्ता मागितला आणि “मी ऑस्ट्रेलियाला जाऊन त्याला भेटून येतो,” असे सांगितले. मात्र आरोपी पत्नी पत्ता देण्यास टाळाटाळ करू लागली. अखेर “मी पोलिसांना घेऊन येतो,” असे दिराने सांगताच, पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन उत्खनन केले असता, आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी मृतदेह आढळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणात पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायनाइडचा वापर झाला होता का, मृत्यूचे नेमके कारण काय आणि इतर पुरावे याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.