TDRF जवानाचाच खड्ड्यामुळे मृत्यू! शेकडोंचे जीव वाचवणारा विकास गोरे काळाच्या पडद्याआड

Rokhthok Maharashtra 10 0

आपत्तीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून शेकडो नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) मधील जवानाचाच रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
31 वर्षीय विकास लहू गोरे हे शहापूरमधील बामणे गावातून ठाण्यातील ड्युटीसाठी बुलेटवरून निघाले होते. मुंबई-नाशिक महामार्गावरील भारंगी नदी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीचे चाक मोठ्या खड्ड्यात आदळले. दुचाकीवरील ताबा सुटून ते दुभाजकावर आदळले. गंभीर जखमी झालेल्या विकास गोरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
विकास गोरे यांनी इरशाळवाडी दुर्घटना, तळिये भूस्खलन आणि भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेसह अनेक बचाव मोहिमांमध्ये जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवले होते. पण आज त्यांचाच जीव एका खड्ड्याने घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी रस्त्यावरील खड्डाच अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप करत, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
दरम्यान, ठाणे महापालिकेने विकास गोरे यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा केली आहे. तसेच शहरातील धोकादायक खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.
मात्र प्रश्न एकच… खड्ड्यांमुळे आणखी किती निष्पाप जीव जाणार? जबाबदारांवर कठोर कारवाई कधी होणार?

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.