फलटणमध्ये संतापजनक प्रकार! ‘अमावस्येपर्यंत तक्रार मागे घ्या’; पीडित कुटुंबाला धमकी?
साताऱ्यात संतापजनक प्रकार! अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या तक्रारीनंतर पीडित कुटुंबालाच धमकी!
सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणाला आता धमकीचे वळण मिळाले आहे.
भूतबाधा झाल्याचे सांगून उपचाराच्या बहाण्याने चौदा वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप संशयित सौरभ नाना मदने याच्यावर आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पीडित कुटुंबाच्या घराबाहेर धमकीवजा चिठ्ठी ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
‘अमावस्येपर्यंत तक्रार मागे घेतली नाही, तर घरदार संपवू!’ असा मजकूर या चिठ्ठीत असल्याचे सांगण्यात येत आहे. चिठ्ठीजवळ लिंबू, हळद-कुंकू आणि टाचण्या ठेवल्याने कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या धमकीमागे नेमके कोण आहे, चिठ्ठी कोणी लिहिली आणि पीडित कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न कोणी केला, याचा तपास पोलिस करत आहेत.
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलींच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी? पीडित कुटुंबाला संरक्षण मिळणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.





