९.४९ कोटींच्या फसवणूक प्रकरणात बाळासाहेब नाहाटा अटकेत!
पुण्यातील बहुचर्चित ९ कोटी ४९ लाख रुपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब ऊर्फ प्रविणकुमार नाहाटा यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने श्रीगोंदा येथून अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र अँग्रो बिझनेस नेटवर्क प्रोजेक्ट अर्थात ‘मॅग्नेट’ योजनेत गुंतवणूक केल्यास अवघ्या ७८ दिवसांत रक्कम तिप्पट परतावा आणि कंपनीचे संचालकपद मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले.
या आमिषाला बळी पडून ११ जणांकडून तब्बल ९ कोटी ४९ लाख ३५ हजार रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, यापूर्वी अजय चौधरी आणि रविराज जोशी यांना अटक करण्यात आली होती.
आता या प्रकरणात बाळासाहेब नाहाटा यांनाही अटक करण्यात आली असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.





