मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्समध्ये घाणीचा कळस! किचनमध्ये झुरळं, टॉयलेटजवळ अन्न; FDAची मोठी कारवाई
मुंबईत तुम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवायला जाता, तिथे स्वच्छतेची काय अवस्था आहे? याचा धक्कादायक खुलासा अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईतून समोर आला आहे.
‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत ४ ते ६ ऑगस्टदरम्यान एफडीएने राज्यात तब्बल ३१ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत तब्बल २ कोटी ८२ लाख ९९ हजार ७७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुंबईतील दहा हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅन्टीनची तपासणी करण्यात आली. यामध्ये काही ठिकाणी कीटकांचा वावर, स्वयंपाकघरात झुरळे, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक अस्वच्छता, निर्जंतुकीकरणाचा अभाव आढळला.
अंधेरीतील ‘जय माँ काली धाबा’मध्ये तर शौचालयाच्या बाजूलाच अन्नाची साठवणूक केल्याचे समोर आले. सांताक्रूझच्या ‘हाऊस ऑफ महाराष्ट्र’च्या स्वयंपाकघरात झुरळे आढळली, तर कुर्ल्यातील ‘साऊथ इंडिया डोसा कॉर्नर’मध्ये कचरा आणि सांडपाण्याच्या विल्हेवाटीची योग्य व्यवस्था नव्हती.
या कारवाईत सहा आस्थापने सील, चार वाहने जप्त, तर प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्याच्या प्रकरणांत २२ जणांना अटक करण्यात आली.
अन्नाच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्यांवर एफडीएची कारवाई अशीच सुरू राहणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.





