पवारांच्या मनात विखे कुटुंबियांबद्दल द्वेष; नगरमध्ये कोणाचाही प्रचार करणार नाही- राधाकृष्ण विखे पाटील

Rokhthok Maharashtra 1 279

मुंबई :(रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मनात विखे कुटुंबियांबद्दल द्वेष भरला आहे. माझे वडील बाळासाहेब विखे पाटील आज हयात नाहीत. निवडणुकीचा संदर्भ घेऊन हयात नसलेल्या व्यक्तीवर शरद पवारांनी बोलायला नको होते, पवारांची टिका मला बोचली, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. नगरमध्ये कुणाच्याच प्रचाराला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. सुजय यांच्या या निर्णयामुळे पक्षश्रेष्ठी संतप्त झाले असून राधाकृष्ण विखे आणि अशोक चव्हाण यांची त्यांच्या पदावरून गच्छंती होणार असल्याचे संकेत काँग्रेस गोटातून मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषद घेउन आपली भूमिका स्पष्ट केली.

आघाडीत जागांची अदलाबदल होत असते. त्यासाठी चर्चा सुरु होती. आघाडीच्या जागा वाढाव्यात यासाठी काँग्रेसने नगरच्या जागेची मागणी केली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार सलग तीनवेळा पराभूत झाला आहे. या मतदारसंघात आमची ताकद आहे, अशी काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका होती. आघाडीधर्म पाळण्याची आमची भूमिका कायम होती आणि आहे, असे ते म्हणाले.

माझे वडील बाळासाहेब विखे पाटील हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते होते. आज ते हयात नाहीत. शरद पवार यांनी बाळासाहेब विखे यांच्याबद्दल जुन्या घटनांचा संदर्भ घेऊन टीका करायला नको होती. शरद पवार यांनी अशी टीका करेपर्यंत सुजयचा भाजपात जाण्याचा निर्णय झालेला नव्हता. आता आमच्या कुटुंबियांबद्दल सहकारी पक्षाच्या मनात शंका असेल, तर त्यांच्या प्रचारात जाऊन मी नगरमधील जनतेच्या मनात संभ्रम का निर्माण करू, असा सवाल त्यांनी केला.

श्रेष्ठींसमोर भूमिका मांडणार

गेल्या दोन चार दिवसांत ज्या घटना घडल्या आहेत, त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहे. त्यासाठी श्रेष्ठींची वेळ मागितली आहे. श्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असे त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

बाळासाहेब थोरातांना स्पष्टीकरण देण्यास बांधील नाही

सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे यांनी आपली पक्षनिष्ठा सिद्ध करावी, असे आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांचे नगरमधील पक्षांतर्गत विरोधक बाळासाहेब थोरात यांनी दिले होते. त्याचाही विखेंनी समाचार घेतला. बाळासाहेब थोरात हे माझे श्रेष्ठी नाहीत. त्यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही. त्याची मला गरजही वाटत नाही. मी काँग्रेस पक्ष आणि त्याच्या तत्वांशी बांधील आहे. आणि मी श्रेष्ठींनाच उत्तर देईन, अशा शब्दात त्यांनी बाळासाहेब थोरातांना उडवून लावले.

0 0 votes
Article Rating
279 Comments
Oldest
Newest Most Voted

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.