रस्त्यांच्या प्रश्नावर नागरिक संतप्त; नगरसेवकांशी जोरदार शाब्दिक वाद!

Rokhthok Maharashtra 1 0

पुण्यातील सूस-महाळुंगे परिसरात खराब रस्त्यांवरून नागरिकांनी आंदोलन छेडले. या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक बाबुराव चांदेरे आणि नागरिकांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
राधा चौक ते महाळुंगे हा रस्ता खड्ड्यांनी भरल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी पुणे महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असताना नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावली.
नागरिकांच्या आरोपानुसार, रस्त्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी चांदेरे यांनी आक्रमक भाषा वापरत काही नागरिकांना धमकी दिली. यानंतर उपस्थित ग्रामस्थांनीही तीव्र विरोध करत घोषणाबाजी केली. वातावरण चिघळल्यानंतर चांदेरे तेथून निघून गेल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, ग्रामस्थांचा आरोप आहे की सूस आणि महाळुंगे पुणे महापालिकेत समाविष्ट होऊनही अपेक्षित रस्ते व इतर विकासकामे झालेली नाहीत. तसेच मंजूर झालेला निधी नेमका कुठे खर्च झाला, याची चौकशी करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
या प्रकरणावर नगरसेवक बाबुराव चांदेरे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.