आधुनिक शेतीतून कांदापातीचे सातत्यपूर्ण उत्पन्न शक्य वडकीच्या ‘मोडक शेती फार्म’चा नाविन्यपूर्ण प्रयोग; वर्षातील ८ ते १० महिने उत्पादनाचे नियोजन

Rokhthok Maharashtra 1 0

फुरसुंगी : पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत योग्य पीकनियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि टप्प्याटप्प्याने लागवड केल्यास शेतीतून सातत्यपूर्ण उत्पन्न मिळवणे शक्य आहे. याचा प्रत्यय पुण्यातील वडकी येथील ‘मोडक शेती फार्म’ येथे सुरू असलेल्या कांदापातीच्या नाविन्यपूर्ण प्रयोगातून येत आहे.

कांदापात हे तुलनेने कमी खर्चात उत्पादन घेता येणारे आणि नियमित मागणी असलेले पीक म्हणून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून नियोजनबद्ध पद्धतीने लागवड केल्यास या पिकातून वर्षभर उत्पन्नाचा स्रोत निर्माण करता येऊ शकतो.

‘मोडक शेती फार्म’ येथे संपूर्ण क्षेत्रावर एकाच वेळी लागवड करण्याऐवजी वेगवेगळ्या टप्प्यांत कांदापातीची लागवड केली जाते. त्यामुळे एका पिकाची कापणी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पीक उत्पादनासाठी तयार राहते. या पद्धतीमुळे वर्षातील सुमारे ८ ते १० महिने उत्पादन सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कांदापातीच्या उत्पादनासाठी मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणाऱ्या जमिनीला प्राधान्य दिले जाते. साधारण ४ ते ६ इंच लागवड अंतर, नियमित सिंचन तसेच सेंद्रिय आणि संतुलित खत व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. योग्य व्यवस्थापन केल्यास लागवडीनंतर साधारण ४५ ते ५० दिवसांनी कापणीला सुरुवात करता येते. त्यानंतर मागणी आणि पिकाच्या वाढीनुसार नियमित कापणीचे नियोजन करता येते.

शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता पीकनियोजन, उत्पादनाचे सातत्य आणि बाजारपेठेची मागणी या तीन बाबींचा समन्वय साधल्यास शेतकऱ्यांना अधिक स्थिर उत्पन्न मिळू शकते, हे या प्रयोगातून दिसून येत आहे.

चौकट : बाजारभावाचा अभ्यास महत्त्वाचा

“कांदापातीचा बाजारभाव साधारणतः सात ते आठ रुपयांपेक्षा खाली सहसा येत नाही. मात्र बाजारपेठेचे ठिकाण, हंगाम, उत्पादनाचा दर्जा आणि मागणी यानुसार दरामध्ये चढ-उतार होऊ शकतो. त्यामुळे लागवडीपूर्वी बाजारपेठेचा अभ्यास करून योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे.”

— अनिकेत मोडक, मोडक शेती फार्म

रोखठोक न्युज फुरसुंगी प्रतिनिधी :- गणेश भागीवंत

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.