महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा– शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे
हडपसर परिसरातील महादेववाडी येथील कृष्णानगर, सर्व्हे नं. 56/8, गल्ली नं. 9 येथे आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे 63 वर्षीय हिराबाई लक्ष्मण जावीर यांचा विद्युत प्रवाहाचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली. उघड्या डीपीमधून तसेच डीपीच्या खांबामध्ये विद्युत प्रवाह असल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच मृत महिलेच्या कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत देत त्यांचे सांत्वन केले. व पुढेही त्यांना लागेल ती मदत करण्यासाठी शिवसेना कटीबद्ध असेल असं शब्द त्यांना दिला.
यावेळी बोलताना प्रमोद नाना भानगिरे म्हणाले, “हा केवळ अपघात नसून महावितरणच्या बेजबाबदार आणि हलगर्जी कारभारामुळे गेलेला एक निष्पाप जीव आहे. सार्वजनिक ठिकाणी उघडी व धोकादायक विद्युत यंत्रणा ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. या घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच हिराबाई जावीर यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत, योग्य नुकसानभरपाई आणि न्याय मिळाला पाहिजे.”
भानगिरे यांनी पुढे इशारा देताना सांगितले की, “महावितरणने या घटनेची केवळ कागदी चौकशी करून वेळकाढूपणा करू नये. दोषींवर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडेल. आवश्यक असल्यास संबंधित महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात येईल. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू दिले जाणार नाही.”
शिवसेनेने या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून शहरातील सर्व धोकादायक डीपी, उघडी विद्युत यंत्रणा आणि विद्युत सुरक्षेचे तातडीने सर्वेक्षण करण्याची मागणी केली असून, भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे आणखी एका नागरिकाचा जीव जाऊ नये यासाठी महावितरणने त्वरित ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी शिवसेनेने केली आली आहे.





