पैशांच्या वादाने घेतला सख्ख्या भावाचा जीव! देहूगावातील धक्कादायक घटना.
पिंपरी-चिंचवडमधील देहूगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची चाकूने वर करून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे इचलकरंजी येथील विनायक आणि घनश्याम हे दोघे सख्खे भाऊ देहूगावातील माळीनगर येथे एकत्र राहत होते. विनायकने काही लोकांकडून उसने पैसे घेतले होते. मात्र, ते परत न केल्याने पैसे मागणारे लोक वारंवार घरी येत होते. याच कारणावरून दोघा भावांमध्ये वाद झाला.
वाद इतका वाढला की, रागाच्या भरात २० वर्षीय घनश्यामने घरातील भाजी कापण्याचा धारदार चाकू उचलून मोठा भाऊ विनायकच्या छातीत वार केला. गंभीर जखमी झालेल्या विनायकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. पैशांच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





