“अखेर ठरलं ….शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे – पुण्याच्या बैठकीत झालेल्या चर्चेत पक्षश्रेष्टींचे संकेत”

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात कोणता पक्ष कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादीच्या गोटातून महत्वाची बातमी समोर आली आहे. शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. अमोल कोल्हेच लोकसभेचे उमेदवार असणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी दिली आहे.
अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अमोल कोल्हेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी आज आढावा बैठक घेतली या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली, अशी माहिती विलास लांडे यांनी दिली आहे.

शरद पवारांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांशी-पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी एकूण या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांना मी मागील चार वर्षांच्या काळातील कामकाजाबद्दल माहिती दिली, असं अमोल कोल्हे म्हणालेत.
शरद पवारसाहेबांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण अंतिम निर्णय योग्यवेळी ते घेतील. साहेब सांगतील ते धोरण, अन् साहेब बांधतील ते तोरण!, असं अमोल कोल्हे म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भोसरीमध्ये पोस्टरबाजी पाहायला मिळाली. शिरूर लोकसभा मतदारसंघात लांडेंकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनर्सवर विलास लांडे भावी खासदार, असं लिहिण्यात आलं होतं. तर या पोस्टरवर संसदेचा फोटोही होता. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार नक्की कोण असणार? याची चर्चा होत होती. मात्र आता आज विलास लांडे यांनीच अमोल कोल्हे हे उमेदवार असतील अशा सूचना असल्याचं सांगितलं आहे.

 

पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महत्त्वाच्या बैठका होत आहेत. पुणे जिल्हा ग्रामीण आणि लोकसभा मतदारसंघाच्या स्वतंत्र बैठका होत आहेत. पुणे जिल्हा ग्रामीणच्या बैठक झाली. या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार उपस्थित आहेत. तर राज्यातील काही लोकसभेच्या मतदारसंघातील शरद पवार आढावा घेत आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.

 

आमदार चेतन तुपे यांची भूमिका ठरली महत्वाची ….
शिरूर लोकसभा मतदारसंघाची बैठक सुरु असताना सुरुवातीलाच या लोकसभा मतदारसंघातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना केलेल्या चांगल्या कामगिरीचे कौतुक केले तसेच डॉ. अमोल कोल्हे हेच पुन्हा योग्य उमेदवार असल्याचे आग्रहाने मांडले. त्यामुळे सर्वानी विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याविषयी सकारात्मक सकारात्मक मते मांडली त्यामुळे वेगळ्या चर्चांना पूर्णविराम देत डॉ.कोल्हे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.