घटना घडली तेव्हा तो मुलगाच कार चालवत होता – अमितेश कुमार
अल्पवयीन मुलाच्या पोर्श धडक प्रकरणाची घटना घडली तेव्हा तो मुलगाच कार चालवत होता. त्याने ते आमच्याकडे मान्यही केलं आहे. तरीही ही घटना घडली तेव्हा मुलगा मागे बसला होता आणि ड्रायव्हर कार चालवत होता आणि त्याच्या हातून अपघात झाला हे भासवण्यात आलं. चालक पोलीस स्टेशनला आला तेव्हा त्याने पहिल्या जबाबात तशीच कबुली दिली होती. मात्र अल्पवयीन मुलगाच कार चालवत होता त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तरीही चालकाने त्याचं म्हणणं सोडलं नव्हतं, चालक सातत्याने हेच सांगत होता की अल्पवयीन मुलगा कारच्या मागच्या सीटवर बसला होता. हे असं सांगण्याचं कारण म्हणजे रात्री ११ च्या सुमारास या चालकाला सोडवून घेऊन गेले होते. त्याचा मोबाइल स्वतःकडे ठेवला आणि त्याला मुलाच्या आजोबांनी डांबून ठेवलं. आम्ही सांगू त्याप्रमाणे जबाब द्यायचा असा दबाव टाकण्यात आला होता. अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
चालकाला त्याचे घरातले लोक अल्पवयीन मुलाच्या घरुन घेऊन गेले…
दुसऱ्या दिवशी चालकाची पत्नी आणि त्याच्या घरातले सदस्य अल्पवयीन मुलाच्या घरी गेले, तिथे त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर त्या चालकाला त्याचे घरातले लोक अल्पवयीन मुलाच्या घरुन स्वतःच्या घरी घेऊन गेले. चालक त्याच्यावर टाकण्यात आलेल्या दबावामुळे घाबरला होता. ड्रायव्हरला गिफ्ट आणि पैशांचं आमिष देण्यात आलं होतं अशी माहिती मुलाच्या आजोबांना अटक केल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.



