पाणीटंचाई विरोधात शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर भव्य हंडा मोर्चा ……..!

Rokhthok Maharashtra 2 0

पाणीटंचाईविरोधात शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर भव्य हंडा मोर्चा
शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात आंदोलन; महिलांनी माठ फोडून नोंदवला निषेध

हडपसर परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात आज पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य हंडा मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात महिलांनी माठ फोडून तीव्र निषेध नोंदवला, तर घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.उन्हाळ्याची सुरुवात होण्यापूर्वीच पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ४१ तसेच परिसरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेने विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या टाक्यांमध्ये नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

या समस्येबाबत शिवसेनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे पाहता या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा हंडा मोर्चा आयोजित करण्यात आला. मोर्चादरम्यान शिवसैनिक आणि नागरिकांनी जोरदार घोषणा देत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. “टाक्या उभारल्या चौकात, पाणी नाही नळात”, अशा घोषणांद्वारे महिलांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र टीका केली.आंदोलनादरम्यान पाणीटंचाईची तीव्रता प्रशासनाला दाखवून देण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टँकर उभा करून पाण्याच्या टाक्या कशा रिकाम्या राहतात याचे प्रतीकात्मक चित्र सादर करण्यात आले. यावेळी महिलांनी माठ फोडून निषेध व्यक्त करत प्रशासनाच्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध नोंदवला. आंदोलनामुळे काही काळ परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि घोषणांनी महानगरपालिकेचा परिसर दणाणून गेला.

 

यावेळी बोलताना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले की, हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ४१ मध्ये महानगरपालिकेने नऊ ते दहा मोठ्या पाण्याच्या टाक्या उभारल्या असून या टाक्यांमध्ये हजारो लिटर पाण्याची साठवणूक क्षमता आहे. मात्र प्रत्यक्षात या टाक्यांमध्ये अत्यंत अपुरा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने युद्धपातळीवर कामकाज करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा येत्या पंधरा दिवसांत प्रश्न मार्गी न लागल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त किशोर राम यांना निवेदन देण्यात आले.

 

 

 

यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य,स्वातीताई टकले, माजी सरपंच राकेश झांबरे, माजी सरपंच मच्छिंद्र दगडे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले,सुभाष घुले, मिलिंद अहिरे, अभिमन्यू दादा भानगिरे, सचिन नाना तरवडे, प्रवीण हिलगे, पंकज कोंद्रे, अभिजीत बोराटे, दत्ता खवळे, शितल गाडे, आशाताई यादव, सुहास पडवळ, राहुल लबडे, आकाश रेणुसे, आकाश टकले, कविता पवार, मनोज जाधव, राणी पाटील, स्मिता साबळे, सचिन भानगिरे, प्रसाद सर, शिंदे मामा, दीपक मरळ, शंतनू सरकार, तुषार मरळ, आशा कांबळे यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.