मुंबई

Rokhthok_Big_Breking_News 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही : उद्धव ठाकरे महाराष्ट्रात काळजीपूर्वक शिथिलता होणार

मुंबई – राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. भाजी मंडईसह काही ठिकाणी होणारी गर्दी चिंतेचा विषय आहे. यामुळे 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही. परंतु काळजीपूर्वक काही गोष्टी सुरु करत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले, तुम्ही गर्दी कराल तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. काही जिल्ह्यांमधून लॉकडाऊन वाढवण्याची मागणी आली आहे. लॉकडाऊन हा शब्द वापरत नसलो तरी काही बंधनं मात्र आपल्याला स्वत:वर घालावी लागतील. सद्य परिस्थितीत काळजी घेणे अपरिहार्य आहे, असेही ते म्हणाले.
राज्यातील जे रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करावा. प्लाझ्मा थेरपीने अनेकांचे जीव वाचवता येऊ शकतात. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांनी स्वत: पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कदाचित देशातील प्लाझ्मा थेरपीचा देणार किंवा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल.
रक्तदानाशी निगडीत प्लाझ्मा थेरपी हा विषय आहे. प्लाझ्मा थेरपी ही आपण मार्चपासून सुरु केली आहे. सुरुवातीला एक-दोन ठिकाणी प्लाझ्मा थेरपी वापरली जात होती. आतापर्यंत जर आपण 10 जणांवर उपचार केले असतील, तर त्यातील 9 जण बरे झाले. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीही उपयोगी पडत आहे. त्यासाठी उद्या त्याचे केंद्र वाढवत आहोत. पहिल्यांदा दोन केंद्र होती. आता त्याचा व्याप वाढवत आहोत.
मार्चपासून करोनाचे संकट आल्यापासून आपल्या हातात जे शस्त्र आले ते घेऊन लढत आहोत.
लॉकडाऊन, ट्रॅकिंग, ट्रेसिंग, चाचण्या वाढवणे, उपचार पद्धती यासारखे अनेक शस्त्र आहेत. तसेच केंद्राकडून ज्या औषधांना परवानगी मिळत आहे त्याचा वापर सुरु आहे. रेमडेसीवीरसारखी औषधे मोफत उपलब्ध करुन देणार आहेत. ही औषधे शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध करण्याचा प्रयत्न असेल, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
आषाढीच्या वारीला जाणार
तुमच्या वतीने मी आषाढीच्या वारीला जाणार आहे. केवळ महाराष्ट्रासाठी नाहीतर अवघ्या देशासाठी, जगासाठी निरोगी आयुष्यासाठी साकडे घालणार आहे. वारकऱ्यांनो तुमचे आशीर्वाद पाठीशी राहु द्या, तुमचे आशीर्वाद घेऊन तुमचा प्रतिनिधी म्हणून विठुरायाचे आशीर्वाद घ्यायला जातोय. मी वारी हेलिकॉप्टरमधुन एरियल फोटोग्राफीद्वारे केली. मला त्या अथांग अवकाशातुन सर्व विसरुन विठुमाऊलीच्या गजरात दंग झालेल्या वारकऱ्यांच्या रुपातुन मला विठ्ठलाचे दर्शन झाले, विश्वरुप दिसले. वारकऱ्यांना सांगतो, नाईलाजास्तव वारीचा सोहळा आटोपशीर करावा लागतोय, असे ते म्हणाले.

Comment here