पुणे MLC निवडणुकीत मोठा ट्विस्ट! प्रदीप कंदांची बंडखोरी, काकडे-टिंगरे वादाने राजकारण तापलं

Rokhthok Maharashtra 2 0

“पुणे विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आता मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे. महायुतीतील जागावाटप, राष्ट्रवादीतील नाराजी आणि भाजपमधील बंडखोरीमुळे पुण्याची लढत चांगलीच रंगतदार बनली आहे.
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार म्हणून विक्रम काकडे यांना मैदानात उतरवले आहे. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर होण्याच्या काही तासांपूर्वीच माजी खासदार संजय काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
मात्र, या निर्णयामुळे पक्षात नाराजीचा सूर उमटला. माजी आमदार आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले की, टिंगरे यांचा अर्ज हा केवळ पर्यायी म्हणजेच डमी अर्ज आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या आदेशानंतर त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला असून पर्यायी उमेदवार म्हणून तुषार कामठे यांचाही अर्ज भरला गेला आहे.
पण या संपूर्ण निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद. ही जागा भाजपला मिळावी अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र जागा राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर त्यांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरीचा झेंडा उभारला आहे.
आता सर्वांचे लक्ष 4 जूनकडे लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतरच खरी लढत कोणामध्ये होणार आणि प्रदीप कंद अर्ज मागे घेणार की मैदानात राहणार, हे स्पष्ट होणार आहे.
पुणे विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि भाजपमधील बंडखोरीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.