अहिल्यानगर हादरलं …. जावयाकडून सासऱ्याच्या घरासमोर जादूटोणा?

Rokhthok Maharashtra 1 0

अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. जावयाने सासऱ्याच्या घरासमोर मध्यरात्री जादूटोणा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली. गोविंद गंगाधर पठारे यांनी आपल्या जावयाला, विशाल लांडगे याला, घटनास्थळी पकडल्याचा दावा केला आहे. मात्र त्याचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेत फरार झाले.  घटनास्थळी पोलिसांना टाचण्या टोचलेले लिंबू, काळी बाहुली, हळद-कुंकू असे साहित्य आढळून आले. तसेच आरोपीच्या बुलेटजवळ कुऱ्हाड, दोरी आणि इतर संशयास्पद वस्तू सापडल्या. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

या घटनेमागे जुना कौटुंबिक वाद असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2020 मध्ये पूनम आणि विशाल यांचा विवाह झाला होता. मात्र 2025 मध्ये पूनमचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी पतीसह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला होता. सध्या पूनमचा तीन वर्षांचा मुलगा आजी-आजोबांकडे आहे. या मुलाला मिळवण्यासाठीच हा प्रकार केला गेला का, याचाही तपास पोलिस करत आहेत.
पीडित मनीषा पठारे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “तो आम्हाला धमक्या देत होता. त्या रात्रीही तो काहीतरी वाईट करण्याच्या उद्देशाने आला होता.”
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अंधश्रद्धेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.