सरकारी नोकरीच्या नावाखाली १.३६ कोटींची फसवणूक; बारामती पोलिसांची मोठी कारवाई

Rokhthok Maharashtra 1 0

बारामती तालुका पोलिसांनी शासकीय नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणात आरोपींनी तरुण-तरुणींना ‘गट-क अधिपरिचारिका’ पदावर सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २०२३ ते मे २०२५ दरम्यान आरोपी अनिकेत पाठक आणि त्याच्या साथीदारांनी महिला हॉस्पिटलमधील स्टाफ नर्स आणि इतरांची ओळख करून घेत विश्वास संपादन केला. त्यानंतर ऑनलाइन आणि रोख स्वरूपात मोठी रक्कम उकळण्यात आली.

विश्वास बसावा म्हणून आरोपींनी बनावट नियुक्तीपत्रेही दिली. मात्र प्रत्यक्षात कोणालाही नोकरी मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, आरोपी सुरज असदकर याला चिंचवडगाव येथून पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणात यापूर्वी अजिंक्य पाठक आणि सुधाकर सोळंकी यांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.