पुणे

“दिग्गज लावणी कलाकार सुरेखा पुणेकर होणार राष्ट्रवादी काँग्रेसवासी” अजित पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार प्रवेश

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. यासंदर्भातील माहिती सुरेखा पुणेकर यांनीच एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीय. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सुरेखा पुणेकर यांनी आपण आतापर्यंत कलेची सेवा केली आता जनतेची सेवा करायचीय असं म्हटलं आहे.

“चित्रपट, कला, साहित्य, संस्कृतिक विभाग मुंबई अध्यक्ष मनोज व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या १६ सप्टेंबरला मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. आतापर्यंत मी कलेची सेवा केली आता मला राजकारणात जनतेची सेवा करायची आहे, महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. १६ सप्टेंबरला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहे,” असं सुरेखा पुणेकर यांनी म्हटलं आहे.

बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या दुसरा सिझनच्या दुसऱ्या भागामध्ये सुरेखा पुणेकर सहभागी झाल्या होत्या. विविध रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही सहभाग नोंदवला आहे. ‘आपल्या अदाकारीने भल्याभल्यांचे फेटे उडवलेली नार, बिग बॉस मराठीच्या घरात कुणाकुणाची झोप उडवणार?’ असा प्रश्न विचारत लावणीचा एक व्हिडिओ कलर्स मराठीने पोस्ट करत बीग बॉसच्या दुसऱ्या पर्वाची जाहिरात केली होती.

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यताही २०१९ साली व्यक्त करण्यात आलेली. खुद्द सुरेखा पुणेकर यांनीच यासंदर्भातले संकेत दिले होते. पुण्यातून भाजपाने गिरीश बापट यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली होती. मात्र त्यांच्या विरोधात कुणाला उभे करायचे यासंदर्भातला चर्चा सुरु असतानाच सुरेखा पुणेकर यांच्या नावाचा विचार होत असल्याची माहिती समोर आली होती. काँग्रेसने लोकसभेसाठी सुरेखा पुणेकर यांना तिकिट दिलं असतं तर पुण्यात सुरेखा पुणेकर विरूद्ध गिरीश बापट असा सामान पहायला मिळाला असता. मात्र काँग्रेसने पुण्यातून चर्चेत असणाऱ्या नावांऐवजी मोहन जोशी यांना लोकसभेची उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.