पुणे

प्रभाग रचनेचे अखेर आदेश दाखल ; इच्छूकांनो आता लागा कामाला – सदस्य संख्या होणार 166 ; तीन सदस्यांचे 54 तर चारचा होणार 1 प्रभाग राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेला सुचना

पुणे
आगामी महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी महापालिकेला मिळाले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेच्या एकूण लोकसंख्यानुसार नगरसेवकांची संख्या 166 इतकी होणार असून त्यामध्ये तीन सदस्यांचे 54 तर चार सदस्यांचा एक असे एकूण 55 प्रभाग रचना करण्याचे आदेश आयोगाकडून देण्यात आले आहेत. आयोगाच्या आदेशानुसार आज बुधवार पासून प्रभाग रचनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होणार आहे.
राज्यातील मुंबई वगळता अन्य 18 महापालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीचे राजपत्र गत आठवड्यात राज्य शासनाने काढले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा करण्याचे आदेश या सर्व महापालिकानां दिले आहेत. या प्रभाग रचना नक्की कशा करायच्या यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनाही आयोगाने दिल्या असून त्यानुसारच या प्रभाग रचना करायच्या आहेत. दरम्यान या या प्रारूप प्रभाग रचनेसाठी काल मर्यादा देण्यात आली नसून कच्चा आराखडा तयार झाल्यानंतर आयोगाला कळवयाचे आहे. त्यानंतर आयोग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे.

नक्की कशी होणार प्रभाग रचना
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेची 2011 ची एकूण लोकसंख्या 35 लाख 56 हजार 824 इतकी दर्शविण्यात आली आहे. त्यानुसार नगरसेवकांची संख्या 166 इतकी असणार आहेत. त्यात 3 सदस्यांचे 54 प्राभाग आणि शेवटचा एक प्रभाग 4 तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रभागांची सरासरी लोकसंख्या :-
प्रभाग रचना करताना महापालिकेची एकूण लोकसंख्या भागिले महापालिकेची एकुण सदस्य संख्या गुणीले त्या प्रभागातील सदस्यांची संख्या या सुत्रानुसार प्रभागाची सरासरी लोकसंख्या निक्षित करावी. प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के कमी किंवा १० टक्के जास्त या मर्यादेत प्रभागाची लोकसंख्या ठेवता येईल असेही आदेशात म्हटले आहे.

प्रभाग रचनेची दिशा :-
प्रभाग रचना सुरु करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी अशी सूचना आयोगाकडून देण्यात आली त्यानुसार धानोरी पासून पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेला सुरवात होणार आहे. तर प्रभाग रचनेचा शेवट दक्षिणेत करावा या सूचनेनुसार कात्रज परिसर हा शेवटचा प्रभाग असू शकणार आहे. प्रभागांना क्रमांकही त्याच पध्दतीने मिळणार आहेत.
भौगोलिक रचना :-
प्रभागाची रचना करताना
प्रभागाच्या सीमा रेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, उड्डाणपूल इत्यादी नैसर्गिक बाबी लक्षात घेऊन त्यानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.