पुणे

उत्तरप्रदेश लखीमपूर येथील शेतकरी आंदोलकांना चिरडले पुण्यात महाविकासाघाडी कडून निषेध आंदोलन

पुणे (प्रतिनिधी)
उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे शांततापूर्वक आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांनी  चिरडले. या हिंसक आणि अमानवीय कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व शहिद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, सिपीआय व शेतकरी बचाव कृती समितीच्या च्या वतीने कृषी महाविद्यालयाच्या चौकात निषेध आंदोलन करण्यात आले होते. लखीमपूर घटनेने केवळ शेतकऱ्यांना नाही तर लोकशाहीला चिरडले आहे. काल उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे एका दौऱ्यावर जात असताना आंदोलक शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी केली व सरकार चा निषेध करत काळे झेंडे दाखवले. याचाच राग मनात धरून मिश्रा यांच्या मुलाने आंदोलक देशाचे अन्नदाते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे पातक केले आहे. या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या निषेध आंदोलनात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांनी आंदोलनातील शहिद शेतकऱ्यांना श्रध्दांजली अर्पण करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की मागील दहा महिन्यात या मग्रूर मोदी सरकारने सहाशे तीन शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. जेंव्हा पासून मोदी-शहा सत्तेत आले आहेत तेंव्हापासून देशाची लोकशाही संपवण्याचे काम ते करत आहेत. हळूहळू त्यांनी देशच विक्रीला काढला आहे. काळापासून तर आत्तापर्यंत शेतकऱ्यांवर अशा प्रकारचे अन्याय करणारा पंतप्रधान देशाला मिळाला नव्हता.आता जनतेने डोळे उघडण्याची गरज आहे. हे आंदोलन सत्तेसाठी किंवा पक्षासाठी नसून देशातील अन्नदात्यासाठी आहे. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील, माजी मंत्री तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,माजी आमदार मोहन जोशी,अभय छाजेड ,कम्युनिस्ट पक्षाचे अजित अभ्यंकर, नितीन पवार यांच्यासह बहुसंख्य महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.