पुणे

आदरणीय नेत्या सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सतराव्या सेवा-त्याग-कर्तव्य सप्ताहाचे गुरुवारी उद्घाटन

पुणे : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा, आदरणीय खा. सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गेली १७ वर्ष सेवा-त्याग-कर्तव्य सप्ताह आयोजित केला जात आहे. यंदा दि. २ ते ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत हा सप्ताह साजरा होणार असून, सप्ताहाचे उद्घाटन गुरुवारी (दि. २ डिसेंबर) बालगंधर्व रंगमंदिरात समारंभपूर्वक केले जाईल. सप्ताहाच्या उदघाटनाला सोनल पटेल, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सप्ताहाचे संयोजक, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बांगलादेश युद्धातील विजयाला पन्नास वर्ष आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विचारात घेऊन वीर जवानांचा सन्मान, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार, महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, व्याख्याने, प्रदर्शने आदी विशेष कार्यक्रम आयोजिले आहेत. कोविड प्रतिबंधक निर्बंधांचे पालन या समारंभात तसेच सप्ताहात केले जाईल, असे मोहन जोशी यांनी स्पष्ट केले.

वीर जवानांना मानवंदना
बांगलादेश युद्धात १९७१ साली भारतीय सैन्याने विजय संपादन केला. या घटनेला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने वीर जवानांचा, हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्या दिवशी सकाळी वीर जवानांना मानवंदना दिली जाईल. तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यंदा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान आणि वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार या सप्ताहात केला जाणार आहे.

महाआरोग्य शिबीर
सध्याचे जगभरातील वातावरण पाहता आरोग्य या विषयाला प्राधान्य देण्यात आले आहे. सप्ताहात महाआरोग्य तपासणी शिबीर रविवार दि. ५डिसेंबर अप्पासाहेब महादेव कुलकर्णी विद्यालय, गोखलेनगर येथे आयोजित केले आहे. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यावेळी उपस्थित राहणार आहेत. या महाशिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह, हिमोग्लोबिन, डोळे, नाक, कान, रक्तदाब, अस्थमा, गर्भाशय आणि स्तन कर्करोग तपासणी करण्यात येईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ईसीजी कार्डिओग्रामही काढला जाईल. महाशिबिरात आरोग्य तपासणी मोफत असून, महिलांसाठी आरोग्य तपासणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

‘७० आणि ७’वर व्याख्यान
ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांचे ‘७० आणि ७ ‘या विषयावर दि. ४ डिसेंबर रोजी व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असणार आहेत.

बाल अत्याचाराविरोधात शपथ
बाल अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या विरोधात आवाज उठविण्यासाठी विविध वयोगटातील मुले-मुली शपथ घेऊन जनजागृती करणार आहेत. यासाठी हेल्पलाईन क्रमांक १०९८ ची सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी अण्णासाहेब अत्रे शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, सोमवार पेठ येथे रांगोळी काढून मेणबत्त्या प्रज्वलित केल्या जाणार आहेत.

‘महागाई’वर रांगोळी स्पर्धा
सध्या जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाल्याने जनतेत असंतोष आहे. हा असंतोष व्यक्त करण्यासाठी शहरात सहा ठिकाणी महागाई विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. यातील वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीला बक्षीस दिले जाईल.

विविध उपक्रमांचे आयोजन
याखेरीज शिबिरात नोकरी महोत्सव, स्त्रियांसाठी प्रशिक्षण शिबिरे, दिव्यांग मुलं-मुली वधू वर मेळावा, बाल आनंद मेळावा, रुग्णांना फळांचे वाटप, अनाथांच्या संस्थांना मिठाईचे वाटप, ‘जयभीम ‘हा सुप्रसिद्ध चित्रपट शहराच्या विविध भागात दाखवण्यात येईल, पुण्यातील जुन्या मंदिरांमध्ये पुराण वाचनाची शंभर वर्षांहून अधिक काळ परंपरा जपणारे श्री. शेंड्ये आणि श्री. पारखी या पुराणिकांचा त्यांच्या सेवा कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

समारोपाला कन्हैय्याकुमार
सप्ताहाचा समारोप युवकांचे लाडके नेते कन्हैया कुमार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या सप्ताहात राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आदी नेते सहभागी होणार आहेत.