पुणे

पुण्यात आंदोलन करताना आचारसंहिता पाळणार – पुणे पोलीस आयुक्तांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक

आज पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरात राजकीय पक्षांच्या सद्यस्थितीत असलेल्या वातावरणा संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, एम.आय.एम, मनसे या सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या बैठकीत यापुढे आंदोलन करत असताना पोलिसांनी घालून दिलेली आदर्श आचारसंहिता पाळण्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत झाले.

देशाची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुणे शहरात राजकीय पक्ष व राजकीय नेते यांची देखील एक आदर्श संस्कृती आहे. गेल्या अनेक वर्षात राज्यासह देशातील इतर शहरांमध्ये राजकीय पक्षांमध्ये अनेक चुकीच्या घटना घडल्या परंतु पुणे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी एक आदर्श आचार संहिता जपत कितीही टोकाचे आंदोलन असले तरी कधी कुठलेही गैरप्रकार झाले नव्हते. राजकारणात राजकीय मतभेद असू शकतात विचारसरणीमध्ये भिन्नता असू शकते. परंतु विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे,त्या लढाईला कुठेही गालबोट लागता कामा नये. पुण्याची हीच राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी पुणे शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना एकत्र घेत घेतलेल्या या बैठकीनंतर नंतर पुणे शहरात राजकीय सलोखा टिकेल असे मत शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री. प्रशांत जगताप अंकुशअण्णा काकडे,भाजपचे शहराध्यक्ष श्री.जगदीश मुळीक,शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे , मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर,आमदार माधुरीताई मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्यासह सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.