पुणे

दुःखद घटना, लोणी काळभोर येथील माळी मळा येथे आजारी वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या मुलीसह मावशीचा लक्झरी बसच्या धडकेने मृत्यू ,

प्रतिनिधी-स्वप्नील कदम

लोणी काळभोर : आजारी वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या मुलीला व मावशीला पुणे-सोलापूर महामार्गावर | रस्ता ओलांडत असताना लक्झरी बसने चिरडल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा येथील राजेंद्र पेट्रोल पंपाजवळ आज मंगळवारी (ता. २४) पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू तर तिच्या मावशीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुरेखा नरसिंग घायाळू (वय ३८), मंमादेवी सूर्यवंशी (वय ४७ दोघेही रा. खंडाळा, ता. आळंद जि. गुलबर्गा (कर्नाटक) अशी मृत्यू झालेल्या मुलगी व मावशीची नावे
आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा घायाळू यांचे वडील तुळशीराम माणिक मुळे (वय- अंदाजे ६५ रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना भेटण्यासाठी मुलगी सुरेखा घायाळू व मावशी मंमादेवी सूर्यवंशी या गुलबर्गा येथून लक्झरी बसने सोमवारी (ता. २३) निघाल्या होत्या. त्यांची बस लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा येथे मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आली. त्यावेळी त्या दोघींनी लक्झरी बस थांबविण्यास सांगितली. मात्र बसवाल्यांनी तेथे थांबा नाही बस थांबत नाही. असे सांगून दोघींना हडपसर येथे उतरविले.

त्यानंतर सुरेखा घायाळू व ममादेवी सूर्यवंशी यांनी येथून सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास रिक्षा केली. त्या
दोघी रिक्षातून माळीमळा येथे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास उतरल्या. त्या दोघी रस्ता ओलांडून जात असताना, सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका लक्झरी बसने त्यांना चिरडले.
या अपघातात मुलगी सुरेखा घायाळू यांचा जागीच मृत्यू झाला. तर मावशी मंमादेवी सूर्यवंशी या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचाही उपचारदरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत केली आहे. पोलिसांनी लक्झरी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. तरी, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
लक्झरी बस माळीमळ्यात थांबली असती तर दोघींचे वाचले असते प्राण… सुरेखा पावा व गंगादेवी सूर्यवंशी या गुलबर्ग्यावरून लक्झरी बसने निघाल्या होत्या. लक्झरी बस चालकांनी जर थोडा विचार केला असता, दोन्ही महिला आहेत. आपण माळी मळ्यात बस थांबवू तर त्या दोघी सुखरूप घरी गेल्या असत्या. मात्र त्याने तेथे गाडी न थांबविता दोघींना हडपसर येथे उतरविले. आणि मावशी व मुलीचा पुणे सोलापूर रस्ता ओलांडताना दुर्दैवी मृत्यू झाला. जर लक्झरी बस माळीमळ्यात थांबली असती तर दोघींचे प्राण वाचले असते. अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.