पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न

हडपसर 24 मार्च

प्रतिनिधी

गुणवत्ता वाढीसाठी कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे योगदान मोलाचे आहे. हे शतक ज्ञानाचे शतक आहे. रयत शिक्षण संस्था गोरगरिबांच्या मुलांना ज्ञान देण्याच्या उद्देशाने निर्माण झाली आहे. त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रश्नमंजूषा स्पर्धांसारखे उपक्रम उपयुक्त ठरत आहेत. अधिकारी होण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त आहे. या युगात ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्वाला महत्त्व आले आहे. असे प्रतिपादन अण्णासाहेब आवटे कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी केले. एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत आयोजित पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी प्रश्नमंजूषा स्पर्धेचा उपक्रम घेण्यात आला आहे. आजच्या तरुणांनी कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी व्हावे. युवकांनी स्वतःला सिद्ध केले पाहिजे. अशा उपक्रमातून ग्लोबल व्यक्तिमत्व तयार होईल. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धेचे चेअरमन उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, प्रा. राहुल वाघमारे, प्रा. ऋषिकेश खोडदे, डॉ.शहाजी करांडे, उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, डॉ.अतुल चौरे, अधीक्षक श्री.शेखर परदेशी, सर्व कमिट्यांचे चेअरमन, सदस्य, शिक्षकेतर सेवक या सर्वांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नम्रता कदम यांनी केले. तर आभार उपप्राचार्य डॉ. संजय जगताप यांनी मानले. प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.