पुणे

“राज्यातील मुली गायब होण्याचे प्रमाण चिंताजनक, महिला आयोगाची धक्कादायक माहिती”

देशभरातील राज्यात मुली/महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत असताना महाराष्ट्रातील परिस्थिती सुध्दा गंभीर होत आहे. महाराष्ट्रात रोज सरासरी ७० मुली गायब होत आहेत असे सांगितले जात आहे. जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातून ३००० च्यावर मुली बेपत्ता झाल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

आता महाराष्ट्रत सर्वात मोठी समस्या सतावत आहे ती मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाणात झालेली लक्षणीय वाढ ! सातत्याने बेपत्ता होणाऱ्या मुली/महिलांचे प्रमाण नक्कीच धक्कादायक तर आहेच त्याबरोबर हे का घडत आहे याचा सुध्दा अभ्यास करुन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

 

मुली मानवी तस्करीत तर ओढल्या जात नाहीत ना ? ही शंका येत आहे. लग्नाचं आमीष, प्रेमाचं आमीष आणि नोकरीचं आमीष दाखवून या मुलींची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात असे काही गुन्हे उघडकीस आल्यावरुन कळते !. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. याचा सर्व समाजाने गांभीर्याने विचार करायलाच हवा.

आधुनिक काळातील मोबाईल द्वारे मुली, महिलांशी चॅटिंग करून त्यांना अनोळखी व्यक्ती आपल्या मोहजाळ्यात अडकवून पळवून नेण्यात येणाऱ्या प्रमाणात होणारी वाढ ही आता धोक्याची पातळी ओलांडत आहे.

 

15-16 वर्षाच्या मुलींना कोण फुस लावून पळवून नेत आहे याचा छडा पोलीस यंत्रणा लावते आहे. परंतु या मुली घर सोडून का जात आहेत याचा गंभीरपणे विचार करायला हवा. तारुण्याच्या उंबरठ्यावर आलेल्या मुली बेपत्ता होतात त्यातील काही मुलींचा शोध लागल्यावर असे निदर्शनास येते आहे की घरातील वातावरण, चिडचिडेपणा, मित्र-मैत्रीणचीं संगत, शारीरिक आकर्षण अशा अनेक गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. तसेच मुलींची दिशाभूल करुन त्यांचे अपहरण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न हा प्रश्नच आहे.

शासकीय यंत्रणा यावर काम करत आहे, परंतु मिया बीबी राजी तो, क्या करेगा काजी या म्हणी प्रमाणे मुलगी जर पालक, पोलीस यंत्रणा यांना दाद देत नसेल तर तुम्ही कायदे कानून आणून काय उपयोग ?

 

बेपत्ता होण्याचे प्रमाण रोखायचे असेल तर सर्वात प्रथम कुटुंबातील व्यक्तींनाच काही योग्य ते संस्कार करायला हवेत. आज स्त्री स्वातंत्र्यखाली काहीं संस्कारित गोष्टींना मागासलेपणा म्हणून गणले जाते आहे ! स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नक्कीच नाही हे महिलांना पटते. परंतु आधुनिक विचारधारेचा परिणाम काही अंशी घातक ठरु शकतो की काय असे बेपत्ता होणाऱ्या मुली/महिलींच्या आकडेवारी वरून आता वाटायला लागलं आहे ! शाळा, कॉलेजात मुलींचं काऊन्सिलींग होणं गरजेचं आहे. पालकही विनवणी करत आहेत की, या मुलींचं काऊन्सिलिंग व्हावं. परंतु पालकांची सुध्दा तेवढीच काऊन्सिलिंग करणे गरजेचं आहे. त्यांनी मुला-मुलीशी संवाद साधत राहावा. ते कुठे जातात, कोणाबरोबर असतात हे सुध्दा माहिती करून घेणे गरजेचे आहे. वेळ निघून गेल्यानंतर काहीच उपयोग होणार नाही.

सुधीर मेथेकर