पुणे

शाळेच्या तसेच प्रायव्हेट स्कूल बस वाले विद्यार्थ्यांच्या जिवाशी करतायेत खेळ, २५ टक्के स्कूल बस, व व्हॅनकडे योग्यता प्रमाणपत्र नसल्याचे उघड…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : सध्या राज्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या असून, शहरात रस्त्यांवर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅन मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या आहेत. यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) ७५ टक्के वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्यात आलेले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तब्बल २५ टक्के स्कूल बस आणि व्हॅनकडे योग्यता प्रमाणपत्र नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकप्रकारे हा चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या नावाखाली त्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.

 

शाळा सुरू होण्याआधी दर वर्षी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅनची तपासणी केली जाते. स्कूल बस अथवा व्हॅनचालकाने दर वर्षी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करणे आवश्यक असते. यंदा शाळा सुरू झाल्यानंतर आरटीओला जाग आली असून, आता स्कूल बस आणि व्हॅन तपासणीसाठी मुहूर्त काढण्यात आला आहे. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुजित डोंगरजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात सध्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या नोंदणीकृत सहा हजार ६०० बस आणि व्हॅन आहेत.

 

त्यातील पाच हजार १७० स्कूल बस आणि व्हॅनला योग्यता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, अजूनही २५ टक्के वाहने योग्यता प्रमाणपत्राविना विद्यार्थी वाहतूक करीत आहेत. प्रत्यक्षात ही संख्या आणखी जास्त असण्याचा अंदाज स्कूल बसचालकांकडून वर्तवला जात आहे. योग्यता प्रमाणपत्र घेणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅनची संख्या केवळ ४० टक्के असावी, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांपैकी ६० टक्के वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नसल्याचा दावाही त्यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे RTO विभाग अशा बसेस आणि व्हॅनवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.