पुणे

सरपंच, ग्रामसेवकांनी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी शासन स्तरावरील योजना आणि नियमांची अंमलबजावणी करावी …. उपसभापती डॉ. नीलमताई गो-हे

पुणे, दि. 2 : कोरोनामुक्त गाव करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांनी शासनाने कोरोनामुक्तीसाठी जे नियम आणि योजना आखल्या आहेत, त्याची अंमलबजावणी केली तर गांव कोरोनामुक्त होऊन तुम्ही लोकं खरे कोरोनामुक्तीचे दूत व्हाल, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गो-हे यांनी केले.
येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुणे ग्रामीण कोरोना आढावा घेण्यासाठी व कोरोनामुक्त गावांच्या सरपंचांशी संवाद साधण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पंचायत समित्यांचे सभापती, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गो-हे पुढे म्हणाल्या, शासनाच्या योजना राबवितांना गावक-यांना सहभागी करुन घेतले. तीच यशस्वी होण्याची पायरी आहे. तिस-या लाटेच्या अनुषंगाने महत्वां चे कारण असेल तरच बाहेर पडावे, अशी सवय लावून घेतली पाहिजे. मास्क लावणे, वारंवार हात धुणे, वेळोवेळी मास्क व्यवस्थित धूवून वापरले पाहिजे. जेव्हा गावेच्या गावे बाधित होऊ लागतात तेव्हा गावपातळीवर गृह विलगीकरणाच्या व्यवस्था फसतात. त्यामुळे दुस-या लाटेमध्ये गृह विलगीकरण कमी करा असा निर्णय घेण्यात आला, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या त्यासाठी कोविड केअर सेंटर सुरु केले. परंतु लोक कोविड सेंटरमध्ये जायला घाबरत होते. परंतु गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवकांनी लोकांचा विश्वास जिंकलात. सकारात्मक माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. कोविडमुक्ततेचे निकष शासनाने जाहीर केलेले आहेत. जिल्हा परिषदेने याबाबतीत चांगले काम केले आहे.
त्या पुढे म्हणाल्या, शासनाने जाहीर केलेल्या योजना राबविण्यासाठी ते घटकच दुर्बल आहेत. त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचल्या पाहिजेत. असंघटीत कामगार म्हणजे बांधकाम कामगार तसेच घरेलू कामगार यांच्यासाठी शासनाने कोरोनाकाळात अर्थसहाय जाहीर केले आहे. परंतु कामगारांची नोंदणी नसल्याने ही मदत संबंधितांपर्यंत पोहोचत नाही. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सर्व बांधकाम कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयाच्या www.mahabocw.in या वेबसाईटवर नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच घरकाम करणा-या कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयात ऑफलाईन पध्दतीने सुरु असल्याचे कामगार उपायुक्त कार्यालयाच्या अधिका-यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. गो-हे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोनाच्या अनुषंगाने राबविण्यात येणा-या उपाययोजना, गावांत कोरोना रुग्ण सापडल्यावर केलेली कार्यवाही, मास्क आणि सोशल डिसटन्सबाबत दंडात्मक कारवाई करताना केलेले नियोजन, सुपर स्रेावडर सर्वेक्षणाबाबत ग्रामपंचायतीने केलेले नियोजन, लसीकरणासाठी गावातील लोकांना कसे प्रोत्साहित केले, लससाठा कमी असल्याने याबाबतचे नियोजन, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटूंबाला कशा पध्दतीने सहकार्य केले याबाबत सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला.
सुरुवातीस जिल्हा परिषदेच्यावतीने 13 तालुक्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा, ग्रामीण भागातील लसीकरण, पेसा कार्यक्षेत्रातील नागरिकांचे लसीकरण, हॉटस्पॉट भागातील धडक मोहिमेतील तपासण्या, एकूण बाधित रुग्ण, तपासण्या करण्यात आलेले रुग्ण, दोन आठवड्यातील आशा सर्वेक्षण, सुपर स्प्रेडर सर्वेक्षण, तुलनात्मक नमुना तपासणी अहवाल, कोरोनामुक्त दर, नगरपालिका निहाय बाधित रुग्ण व क्रियाशील रुग्णांचा तपशील, मागील 3 महिन्यातील वयोगटानुसार मृत्यू दर, हॉटस्पॉट गावे, सर्वात जास्त क्रियाशील रुग्ण असलेल्या हॉटस्पॉट ग्रामपंचायती, कार्यान्वित झालेल्या ऑक्सिजन प्लांटची माहिती, म्युकरमायकोसीसची पुणे ग्रामीण सद्यस्थिती, कोविड लसीकरण केंद्र आणि लससाठा तपशील, कार्यरत मनुष्यबळ, रुग्णवाहिकांचा तपशील, प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत दंडात्मक कारवाई, रुग्णांचे बिल व्यवस्थापन अहवालाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.