पुणे

शिरुर लोकसभेसाठी दहा वर्षानंतर पुन्हा मोदींच्या हातात आढळरावांचा हात, तिकीट फिक्स…?

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : आगामी 2024 च्या येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला शुभसंकेत दिल्याचे सांगून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूरच्या उमेदवारीरून चाललेले राजकारण आणि महायुतीत निर्माण झालेला मोठा प्रश्न सुटला असल्याचे सांगितले आहे. लोहगाव विमानतळावर मोदींचे स्वागत करताना आढळराव पाटील आणि मोदी यांच्यात काही वेळ चर्चा झाली. त्या दरम्यान मोदींनी आढळरावांचा हातात हात घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

प्रधानमंत्री मोदी मंगळवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी माजी खासदार आढळराव यांना सकाळी तुमचा विशेष निमंत्रितांच्या यादीत समावेश करीत असल्याचा मेसज देण्यात आला. लोहगाव विमानतळावर मोदी उतरल्याबरोबर त्यांचे स्वागत करणारांमधील मान्यवरांत आढळरावांचा समावेश होता. याबाबत आढळराव म्हणाले, “विमानातून उतरताच एकेक करुन मोदी प्रत्येकांशी हस्तांदोलन करत होते. मात्र जवळ येताच मोदींनी माझा हातात हात घेवून आवर्जून विचारपूस केली. शिरुर लोकसभा मतदारसंघात मी सध्या कसा सक्रीय आहे तसेच मतदारसंघात कसे कामकाज चालू आहे याची माहिती घेतली.
या भेटीमुळे दहा वर्षांपूर्वी मोदी-आढळराव यांच्या भेटीच्या आठवणींना उजाळा मिळाला. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे 2013 मध्ये शिरुरचे असणारे खासदार आढळराव यांना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदींनी अहमदाबाद येथे निमंत्रित केले होते. त्यावेळी राजकीय विषय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या मतदारसंघ शिरुरची चर्चा केली होती.

 

पुढील काळात आढळराव शिरुरचे खासदार म्हणून तिसऱ्यांदा लोकसभेत गेले होते. त्याच घटनाक्रमाची पुनरावृत्ती व्हावी असाच काहीसा प्रसंग पुण्यात मंगळवारी घडला. मोदींनी आवर्जून आढळरावांची भेट घेऊन पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिरुरची माहिती घेतली. अर्थात हा आपला लोकसभा 2024 साठीचा पुन्हा एकदा शुभसंकेत असल्याचेच आढळरावांनी आवर्जून सांगितले.

2013 मोदींबरोबर झालेल्या भेटीत आढळराव हे उद्योगपती असल्याची चर्चा झाली होती. त्याला अनुसरुनही मोदींनी पुन्हा दोघांमधील जुन्या चर्चांना थोडक्यात उजाळा दिल्याचेही आढळरावांनी आवर्जून सांगितले. “या भेटीनंतर तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा थेट नरेंद्र मोदींचाच हातात हात आल्याने माझ्यासाठी हा लोकसभा निवडणुकीसाठी शुभसंकेत आहे”, असे आढळरावांनी स्पष्टच बोलून दाखविले.