पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू धान्य व साधनसामग्रीचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा हे साधारण पंधरा दिवसांपूर्वी मणिपूर आपत्तीग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर होते. तेथे पाहिलेल्या अत्यंत हृदयद्रावक परिस्थिती नंतर चिंताग्रस्त झालेल्या प्रशांत जगताप व धीरज शर्मा यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या सूचनेनुसार मनिपुर आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी पुणे शहरात मणिपूर आपत्तीग्रस्त मदत कक्ष सुरू केला.

या कक्षाद्वारे संकलित झालेल्या विविध वस्तू व संकलित रकमेतून मोठ्या प्रमाणात धान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचा साठा घेऊन आम्ही मणिपूरमध्ये दाखल झालो, आज आम्ही संबंधित मदत तेथील राज्यपाल अनुसुया उकिये यांच्याकडे सुपूर्द केली. मणिपूरच्या राज्यपालांकडे मागणी करत असताना,” छावणी मधील नागरिकांना लवकरात लवकर त्यांची घरे बांधून देण्यात यावी व त्यांना राहण्यायोग्य सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात यावे, मुलांच्या शाळा लवकरात लवकर सुरू करण्यात याव्या तसेच मुलांच्या शाळांची संपूर्ण फी सरकारने भरावी”,अश्या मागण्यांचे निवेदन दिले.तसेच तेरापुर या गावात प्रत्यक्ष मदतीचे वितरण करत आजचा रक्षाबंधनाचा सण या आपत्तीग्रस्त महिलांसमवेत राखी बांधून साजरा केला.

” मणिपुरसारखे राज्य जळत असताना, एवढी मोठी आपत्ती आलेली असताना मणिपूर राज्यातील भाजप सरकार व केंद्रातील भाजप सरकार या दोघांनीही या आपत्तीमध्ये मणिपूरवासियांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडलेले आहे. तेथे मणिपूरवासीयांचा संपूर्ण संसाराची राख रांगोळी झालेली असताना देखील सरकारला त्यांना मदत करावीशी वाटत नाही, हे खरोखर दुर्दैवी चित्र आहे. अशा परिस्थितीमध्ये या बांधवांना आशेचा किरण म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही मदत इथपर्यंत पोहोचवत आहोत, तसेच मणिपूर जळत असताना भारतातील इतर राज्य बघ्याची भूमिका घेत आहेत. भारतात लोकशाहीला मानणारे जे काही कार्यकर्ते आहेत ते मनिपुरवासियांच्या सोबत आहेत, असा संदेश आम्हाला या निमित्ताने द्यायचा आहे”, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले. याप्रसंगी प्रशांत जगताप , धीरज शर्मा , इबोमया सोहराम, किशोर कांबले, जावेद इनामदार, रुपेश गायकवाड़, तालिब मदारी , रमीज़ सय्यद आदि या दौर्यात सहभागी झाले.