पुणे

कृषी उत्पन्न बाजार समितीचा नवा फतवा अन मालविक्री वरून खोतीदार – व्यावसायीकांचे मांजरी उपबाजारात निषेध आंदोलन

पुणे ः मांजरी उपबाजारमध्ये खोतदारांनी गांजा, अमलीपदार्थ आणला आहे का, शेतमाल चोरून आणला आहे का, पाकिस्तानातून आणला आहे का, हे सिद्ध करून दाखवा, आमच्यावर कारवाई करा, असा आक्रोश करीत खोतीदार आणि व्यावसायिकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी बु।। येथील कै. अण्णासाहेब मगर मांजरी उपबाजारमध्ये जोरदार घोषणाबाजी करीत निषेध केला. खोतीदार आणि व्यावसायिकांनी आणलेल्या शेतमालाची वाहने काही वेळ थांबविल्याने सोलापूर रस्त्यावर वाहतूककोंडी झाली होती.

मांजरी बाजारमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, यावेळी हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण शांत केले. याप्रसंगी गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर, संचालक सुदर्शन चौधरी, प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर, सहसचिव शिवाजी गायकवाड, उपसचिव संभाजी काळजे, बाळासाहेब तळेकर, मांजरी उपबाजारप्रमुख कल्याणराव कोतवाल, रमेश उंद्रे, किरण घुले, राहुल शेवाळे, केतन घुले, व्यावसायिक संघटनेचे बाळासाहेब भिसे, शिवाजी सूर्यवंशी, साहेबराव झांबरे, प्रेम आटोळे, अशोक मुळीक, गणेश कामठे आदी मान्यवर उपस्थित होते.

भिसे म्हणाले की, मांजरी उपबाजार सुरू झाल्यापासून व्यावसायिक येथे शेतमाल विक्री करीत आहेत. तोंडी आदेश देऊन व्यावसायिकांना शेतमाल विक्रीसाठी बंदी घातल्याने तरुण व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतमाल आणत आहे. दुबार विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई करा, अशी आमची मागणी आहे. मात्र, बाजार समिती चुकीचा निर्णय घेऊन व्यावसायिकांना वेठीस धरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शेखर काळभोर म्हणाले की, एकत्र कुटुंब राहिलेली नाहीत. त्यामुळे मुलं शाळेत, वृद्ध आई-वडिल घरी आणि पती-पत्नीने शेतात काम करायचे की, शेतमाल विक्रीसाठी यायचे. त्यामुळे शेतकरी शेतातच व्यापाऱ्यांना शेतमाल विक्री करतो, तो माल व्यावसायिक येथे आणून विक्री करतात, ही परंपरा मागिल अनेक वर्षांपासून सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

बाजार समितीचे सचिव धोंडकर म्हणाले की, मांजरी उपबाजार शेतकरी ते विक्रेता असा आहे. मागिल काही दिवसांपासून व्यापारीच जागा अडवून बसतात, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली होती, त्यानंतर पाहणी करून व्यापारी आणि दुपार विक्रेत्यांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर शेतमाल आणणाऱ्या व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डमध्ये नेऊन विक्री करावी, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मांजरी उपबाजारप्रमुख कल्याणराव कोतवाल म्हणाले की, आज शेत मालविक्रीसाठी परवानगी दिली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी येथील कार्यालयात व्यावसायिक आणि सभापती, संचालक मंडळांबरोबर चर्चा होईल, त्यामध्ये योग्य मार्ग काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.