पुणे

आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे !

आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे ! होय सगळीकडे आनंद असतोच. फक्त तो कसा, केंव्हा व कुठं घ्यायचा ते मात्र आपणच ठरववाव लागते. आपलं मन हेच आनंद सागर आहे. आनंद देरे हरी, बाजेवरी! असा मुळीच नाही. कारण आनंद घ्यायचा असेल तर विशिष्ट अशा आवडीच्या क्षेत्रात आपल्याला झोकून द्यावंच लागताना.

आपल्या मनाला आनंद देणाऱ्या भरपूर गोष्टी असतात. कोणाला चित्रपट, नाटक पहाण्यात आनंद मिळतो, कोणाला खेळतां आलें नाहीं तरी खेळ पहाण्यात आनंद मिळतो तर कोणाला वाचण्यातुन/ लिखाणातून आनंद मिळतो. शेवटी जेथे मन रिझवलं जाते तेथे आनंदाचे भांडारच असतं ना !

 

असंच काहीसं माझं झालं आहे. शालेय जीवनात असताना जिंतूर येथे मावशीकडे जात, तेव्हा तेथे “किर्लोस्कर” मासिक वाचायला मिळाले. त्यात उद्योग महर्षी शंतनुराव किर्लोस्कर यांचा जीवनपट उलगडणारा लेख वाचला, तेव्हा पासून खरी वाचण्याची आवड निर्माण झाली म्हंटले तर वावगे ठरणार नाही. अन् यामुळेच विद्या व संस्कृतीचे माहेरघर असणाऱ्या पुण्याबद्दल ओढ निर्माण झाली. ज्यावेळी पुणे येथे यायचं निश्चित झाले, त्यावेळचा आनंद शब्दात मांडता येत नव्हता. एवढा आनंद झाला होता. तो आनंद आजही कायम आहे.

पुणे तेथे काय उणे म्हणतात त्याचा प्रत्यय मला आला. कारण संपत्तीक परिस्थिती कशी असो, कामातून मिळणारा आनंद उपभोगण्याची कला मला मात्र मला येथे शिकायला मिळाली. सकाळी सकाळी आपल्या सायकलवरून कामासाठी निघालेली मंडळी समोर दिसणाऱ्या ओळखीच्या लोकांना एक हात सायकलवरील काढून तो उंचावून “चला” म्हणून आनंदाने मार्गक्रमण करणारी व्यक्ती पाहून कळतनकळत आपलाही हात उंचावून चला हा शब्द मुखातून बाहेर पडतो ! तो सुद्धा मनाला एक वेगळा आनंद देवून जात असे.

रात्री शिफ्ट सुटल्यावर गाडीतळावरिल हातगाडीवरील गरमागरम भजी खाण्याचा आनंद काही औरच ना ! छोट्या छोट्या गोष्टींतून भरपूर आनंद लुटता येतो ! तो निराळाच !!

 

माझ्या वाचण्याचा छंद येथे जोपासला गेला व यातूनच स्फुट लेखन करायला संधी मिळाली ते विविध वर्तमानपत्रातून. ज्यावेळी पहिला लेख मासिकात प्रकाशित झाला तो आनंद निराळाच होता. तो लेख सर्वांना दाखवून त्यावर मिळालेला प्रतिसाद आनंद द्विगुणित करणाराच होता ना. आपल्या कलागुणांना वाव मिळत गेल्यावर आपण त्यात संपूर्ण तन्मयतेने एकरुप होऊन जातो अन् मग मनातील अस्वस्थता केंव्हा संपली ते आपल्याला लक्षात येत नाही.

खरंतर आपण म्हणतो “मन चिंती ते वैरी न चिंती !” अन् हेच मन भरकटून मग आपण अस्वस्थ होतो, त्यामुळे हे अस्वस्थ मन कार्यात अडथळा निर्माण करते. वेळेत इच्छीत पूर्ण न झाल्याने आपण दुःखी कष्टी होतो त्यामुळेच आपल्या आनंदावर विरजण पडते!

 

याची जाणीव झाल्याने मी वाचण्यात आणि लिहीण्यात माझा मीच आनंद शोधत गेलो. यातुनच साहित्य क्षेत्रातील दिग्गज डॉ.राम शेवाळकर, डॉ.यू.म.पठाण, डॉ.ग.प्र.प्रधान, डॉ . रामचंद्र देखणे, मा.खा.बापूसाहेब काळदाते, डॉ.रामनाथ चव्हाण, डॉ.न.म.जोशीसर, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील डॉ.दादा गुजर, पुणे विद्यापीठ मा. कुलगुरू डॉ.श.ना. नवलगुंदकर, जेष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे, सविता भावे, जेष्ठ संपादक, पत्रकार अरविंद गोखले आदी मान्यवरांचा सहवास लाभला जो मनाला आनंद व स्फूर्तिदायक होता व आहे.

सुधीर उद्धवराव मेथेकर,
पुणे